‘ब्रेड-बटर’ही महागले, बेकरी उत्पादकांचा निर्णय

Inflation News : सध्या विविध कारणांमुळे सर्वत्र महागाई वाढत आहे. त्यातच आता बेकरी व्यावसायिकांनी सर्वप्रकारच्या बेकरी पदार्थांच्या किमतीत दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

१० सप्टेंबरपासून ही वाढ लागू होणार आहे. त्यामुळे नागरिकांना आता ‘ब्रेड-बटर’साठीही जादा पैसे मोजावे लागणार आहेत. नगर जिल्ह्यातील बेकरी उत्पादक, विक्रेते यांची बैठक नुकतीच नगरमध्ये झाली.

त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. कच्च्या मालाच्या वाढत्या किंमती, जीएसटी, व्यवस्थापन खर्च या सर्वांचा विचार करता, बेकरी पदार्थांमध्ये किंमतीमध्ये १० टक्के वाढ करण्याचा निर्णय जिल्ह्यातील बेकरी विक्रेते-उत्पादकांनी घेतला आहे.

बेकरी पदार्थांच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या मैदा साखर तूप असे विविध कच्च्या मालाच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर केंद्र शासनाने बेकर्स उत्पादनावर जी.एस.टी. लावल्यामुळे सध्या बेकरी व्यवसाय करणे अवघड झाले आहे,

त्यामुळे ही वाढ करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. बेकरी व्यावसायिकांची लवकरच संघटना स्थापन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.