होळी, धूलीवंदन आणि रंगपंचमी साधेपणाने साजरे करा ! जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी जारी केले आदेश

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:-कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन होळी, धूलीवंदन आणि रंगमंचमी सण कोणत्याही प्रकारे गर्दी न करता साधेपणाने साजरा करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत.

जिल्हावासियांनी या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाघिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी केले आहे. त्याचबरोबर, जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून गर्दी टाळण्यासाठी एकत्रित येऊन सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स,

रिसोर्ट, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक व खासगी मोकळ्या जागा, सर्व गृहनिर्माण संस्थांमधील मोकळ्या जागा येथे दिनांक २८ मार्च ते २ एप्रिल, २०२१ या कालावधीत कोणत्याही सार्वजनिक स्वरुपाचे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनास प्रतिबंध करण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आज यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास ते साथरोग अधिनियम १८९७ मधील तरतूदीनुसार भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) च्या कलम १८८ नुसार दंडनीय,

कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, होळी, धूलीवंदन, रंगपंचमी संदर्भात राज्य शासनाने ज्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यांचे पालन जिल्हावासियांनी करावे.

राज्य शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोणत्याही प्रकारे गर्दी न करता सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन करावे. एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण टाळावी.

धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत. या मार्गदर्शक सूचनांपेक्षा कडक निर्बंध स्थानिक प्रशासनाने लागू केल्या असतील तर ते लागू राहतील तसेच या मार्गदर्शक सूचनांच्या परिपत्रकानंतरही कडक निर्बंध लागू शकतील,

स्थानिक पातळीवर संबंधित शासकीय विभाग व यंत्रणांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe