कामगारांचे शोषण करणार्‍या व्यवस्थापना विरुद्ध छावा क्रांतीवीर सेनेचे उपोषण

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :-  शहरात कामगारांचे शोषण करणार्‍या व्यवस्थापना विरुद्ध कारवाई करून कामगारांना न्याय मिळण्याच्या मागणीसाठी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील भूजल सर्वेक्षण कार्यालयाच्या आवारात उपोषण करण्यात आले.

या आंदोलनात छावाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे, बबनराव वाघुले, श्रीहरी लांडे, सुभाष आल्हाट, दिपक चांदणे, प्रसन्न सटाळकर, विनोद साळवे, शाहीर कान्हू सुंबे, शामवेल थोरात, विजय वहाडणे, राम कराळे, डॉ. संतोष लांडे, महेश काळे आदींसह कामगार सहभागी झाले होते.

कोरोना महामारीच्या काळामध्ये कंपनी व्यवस्थापनाने अनेक कामगारांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले. जुने कामगारांना पूर्वसूचना न देताच कंपनीतून कामावरुन त्यांना काढून टाकण्यात आले.

त्यांच्या जागी नवीन कामगार भरती करण्यात आली आहे. या कामगारांना न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी छावा क्रांतीवीर सेनेने पुढाकार घेतला आहे. कंपनीने कामगारांना किमान वेतनचा लाभ न देताच कामगारांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले आहे.

यास जबाबदार अधिकारी मूग गिळून गप्प असून, बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. कामगारांवर अन्याय व फसवेगिरी करणार्‍या व्यवस्थापना विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे निवेदनात म्हंटले आहे.

सावेडी रोड येथील संत नागेबाबा मल्टीस्टेट संस्था व चोलामंडल फायनान्स कंपनी या दोन्ही आस्थापनांनी 11 पेक्षा जास्त कर्मचारी असूनही त्यांचे पीएफ व किमान वेतन याचा लाभ कर्मचार्‍यांना दिलेला नाही. या संस्थे विरुद्ध कायदेशीर कारवाई करावी.

दौंड रोड येथील कायनेटिक इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीने कायम कामगारांना त्यांच्या निवृत्तीनंतर ग्रॅच्युइटीची रक्कम दिली नाही. हंगामी कामगारांना किमान वेतन न देता जुन्या कामगारांना कामावरून कमी करण्यात आले आहे.

तरी या कामगारांना कामावर परत घ्यावे. बांधकाम कार्यालयात अनेक कामगारांना ऑनलाईन नोंदणी चा फटका बसला असून, नोंदणी करूनही अद्याप त्यांना शासकीय आर्थिक मदतीचा लाभ मिळाला नसून त्यांना तात्काळ लाभ देण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe