Chitra Wagh : भाजप महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी काही दिवसांपूर्वी पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येसाठी यवतमाळचे आमदार संजय राठोड दोषी असल्याचे आरोप केले होते. पण आता चित्र वाघ यांची भूमिका मवाळ होताना दिसत आहे. आज त्यांना याबाबत प्रश्न विचारले असता त्या पत्रकारांवर चांगल्याच भडकल्याचे दिसले.
आता संजय राठोड हे शिंदे गटाचे आमदार आहेत आणि शिंदे गटाने भाजपसोबत हातमिळवणी करत राज्यात सरकार स्थापन केले आहे. ठाकरे सरकारच्या काळात संजय राठोड यांच्यावर आक्रमकपणे आरोप करणाऱ्या चित्रा वाघ अचानक मवाळ झाल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

अमरावतीमध्ये माध्यमांशी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या होत्या की, संजय राठोड प्रकरण आता संपवूया. त्याशिवाय महाराष्ट्रात खूप विषय प्रश्न आहेत. संजय राठोड यांच्या विरोधात लढा सुरूच राहील पण तो न्यायालयात असे त्या काल म्हणाल्या होत्या.
मात्र आज चित्रा वाघ यांनी यवतमाळ दौऱ्यावर असताना पत्रकार परिषद घेतली यामध्ये त्यांना संजय राठोड यांच्याविषयी विचारण्यात आले तेव्हा त्यांचा पारा चांगलाच चढल्याचे दिसले.
संजय राठोड यांच्याविषयी विचारताच चित्रा वाघ उभ्या राहिल्या आणि हातवारे करत त्यांनी पत्रकारांवरच राग काढण्यास सुरुवात केली. त्यांनी हिंदीमध्ये पत्रकारांना खडेबोल सुनावले, न्याय व्यवस्था है क्या आप? मै गई हू ना न्यायालय में. आप मुझको मत सिखाईये अशा शब्दात त्यांनी पत्रकारांना झापले.
असल्या पत्रकार ना बोलवू नका माझ्या पत्रकार परिषदेला. सुपारी घेऊन प्रश्न विचारतात असे म्हणत चित्रा वाघ पत्रकार परिषदेमधून निघून गेल्या. त्यामुळे आता इथून पुढे चित्रा वाघ संजय राठोड यांच्याबाबत मवाळ भूमिका घेताना दिसत आहेत.
काय प्रकरण आहे?
पूजा चव्हाण नावाच्या तरुणीने 7 फेब्रुवारी 2021 रोजी पुण्यामध्ये वानवडी परिसरात आत्महत्या केली.
पूजा चव्हाण ही टिक टॉक स्टार म्हणून प्रसिद्ध होती.
तिच्या आत्महत्येनंतर संजय राठोड यांच्यावर देवेंद्र फडणवीस आणि चित्रा वाघ यांनी आरोप केला होता.
त्यानंतर संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांचे कथित फोन संभाषणाच्या ऑडिओ क्लिपदेखील भाजपने सादर केल्या होत्या.