अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :- कोरोनाचा नवा प्रकार ओमायक्रॉनचे राज्यात आतापर्यंत १० रुग्ण पॉझिटिव्ह असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. जिनोम सिक्वेन्सिंगसाठी आणखी ६५ जणांचे नमुने पाठवले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
जगभरात या प्रकारामुळे होणारा मृत्युदर अत्यंत कमी आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत,
त्यामुळे चिंतेचे कारण नसल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले आहे. पुढे बोलताना मंत्री टोपे म्हणाले, “विमानतळांवर तपासणीची काळजी घेतली जात आहे.
पॉझिटिव्ह रुग्ण हायरिस्क, नो रिस्क देशांतून येत आहेत का, याची काळजी घेतली जात आहे. तसेच ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि टेस्टिंगवर भर दिला जात आहे.
बाहेरील देशांतून आलेल्या प्रवाशांवर लक्ष ठेवले जात आहे. आपण उपाययोजना करत आहोत. लसीकरणानंतर संसर्ग झाला तरी, त्याचा धोका नसतो.
कुठल्याही परिस्थितीत नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन टोपे यांनी यावेळी केले. विमानतळावरील आरटीपीसीआर चाचणीचे दर कमी करण्यासंदर्भात प्रयत्न करत आहोत. ते दोन हजार रुपयांदरम्यान आणण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही टोपे यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम