धरण क्षेत्रात पुन्हा कोसळधार ! भंडारदरा धरणांच्या पाणीपातळीत वाढ

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :- उत्तर नगर जिल्ह्याचे जीवनदायिनी असलेल्या मुळा आणि भंडारदरा पाणलोटात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. जोरदार पाऊस कोसळत असल्याने नगर जिल्ह्यातील धरणांमध्ये या हंगामातील नवीन पाण्याची विक्रमी आवक झाली आहे.

यातच भंडारदरातील पाणीसाठा आता 75 टक्क्यांवर पोहचला आहे. गत आठवड्यात चार दिवस पाणलोटात जोरदार पाऊस कोसळत होता. त्यामुळे भंडारदरातील साठा तासागणिक वाढत होता.

त्यानंतर या पावसाने शुक्रवार आणि शनिवार काहीशी विश्रांती घेतल्याने धरणातील नवीन पाण्याची आवक मंदावली होती. पण रविवारी सकाळपासून पावसाने जोर पकडला. त्यामुळे धरणात गत बारा तासांत 226 दलघफू नवीन पाण्याची आवक झाल्याने पाणीसाठा 7238 (65.57 टक्के) झाला होता.

भंडारदरासह घाटघर, पांजरे, रतनवाडीत धो धो पाऊस कोसळत असल्याने धरणात जोरदार पाण्याची आवक होत आहे. आज विक्रमी पाण्याची आवक होणार असून हे धरण 75 टक्के भरण्याची शक्यता आहे.

भंडारदरा येथे रविवारी दिवसभर पडलेल्या पावसाची नोंद 47 मिमी झाली आहे. मुळा पाणलोटातील हरिश्चंद्र गट, आंबित, पाचनईत अधूनमधून आषाढ सरी जोरदार कोसळत आहेत. त्यामुळे मुळा नदीचे पाणी वाढत असल्याने आज धरणात मोठ्या प्रमाणात पाणी जमा होण्याची शक्यता आहे. मुळा नदीचा विसर्ग कोतूळ येथे सकाळी 5327 क्युसेक होता.

त्यात सायंकाळी वाढ होत तो 6260 क्युसेक होता. मुळा धरणातील पाणीसाठा काल सकाळी 12568 दलघफू होता. तो सायंकाळी 12837 दलघफूवर पोहचला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe