मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात भाजप (Bjp) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या पत्नी प्रो. डॉ मेधा किरीट सोमय्या (Medha Kirit Somaiya) यांनी त्यांच्यावर टॉयलेट घोटाळ्याचे आरोप केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
संजय राऊत यांच्याविरोधात ही तक्रार मुलुंडच्या नवघर पोलीस ठाण्यात (Navghar Police Station) दाखल केली असून भादंवि कलम 503, 506 आणि 509 अंतर्गत ही तक्रार दाखल केली आहे.
संजय राऊत यांनी टॉयलेट घोटाळ्याप्रकरणी केलेल्या आरोपांमुळे आपली बदनामी झाल्याचे सांगत मेधा सोमय्या यांनी किरीट सोमय्या यांच्या उपस्थित ही तक्रार दाखल केली आहे.
तसेच पोलीस आयुक्तांनी पोलिसांना प्रत्येक घटनेचे एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. आता मी राऊतांविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्याचा एफआयआर नोंदवावा, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.
दरम्यान किरीट सोमय्या आणि मेधा सोमय्या आज दुपारी नवघर पोलीस ठाण्यात आले होते. यावेळी त्यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर सोमय्यांनी मीडियाशी संवाद साधला. प्रो. डॉ मेधा किरीट सोमय्या यांनी राऊतांविरोधात भादंवि 503, 506, 509 अंतर्गत एफआयआर रजिस्टर करावी.
मेधा सोमय्या या ३५ वर्ष शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. राऊत यांनी त्यांचं चारित्र्य हनन केलं आहे. सोमय्या परिवारावर दडपण आणलं. त्यामुळे त्यांच्यावर एफआयआर दाखल झाला पाहिजे, असे सोमय्या म्हणाले आहेत.