अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल असं वादग्रस्त वक्तव्य केलं.
भगतसिंह कोश्यारी औरंगाबाद दौऱ्यावर असताना बोलत होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेत निषेध नोंदवला असून याप्रकरणी सोमवारी (२८ फेब्रुवारी) पुण्यात आंदोलनाची घोषणा केली आहे.

नेमके काय म्हणाले भगतसिंह कोश्यारी? :- “महाराजा, चक्रवर्ती सगळे झाले. चाणाक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही.
प्रत्येकाच्या मागे आईचं मोठं योगदान असतं, तसंच आपल्या समाजात गुरूचं मोठं स्थान असतं. शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटलं की तुमच्या कृपेने मला राज्य मिळालं आहे.
ते पुढे म्हणाले, “आता या देशाची परंपरा आहे, गुरू आहे तर त्याला गुरुदक्षिणा द्यावी लागते. त्यामुळे मी जिंकलोय, राज्याची स्थापना देखील झाली आणि मी रायगडावर आलो आहे.
आता गुरुदक्षिणा म्हणून या राज्याची चावी तुम्हाला देतो, असं शिवाजी महाराज समर्थांना म्हटले, पण समर्थांनी ती चावी घेतली नाही. समर्थांनी शिवाजी महाराजांना ते या राज्याचे विश्वस्त असल्याचं सांगितलं. हा भाव अशा सद्गुरूकडे मिळतो.”