कोरोनाचा संसर्ग वाढला… जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिले हे आदेश

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. यामुळे कोणत्याही परिस्थितीत कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यास आणि प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यास सर्वोच्च प्राथमिकता द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी तालुकास्तरीय यंत्रणांना दिले.

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, जिल्ह्यात सातत्याने रुग्णवाढ नोंदवली जात आहे.

ही रोखण्यासाठी स्थानिक यंत्रणेने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करणे आणि कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन या महत्वाच्या बाबींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. हिवरे बाजार पॅटर्न अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या समित्यांनी त्यांची जबाबदारी चोखपणे बजावली पाहिजे.

जिल्ह्याचा आरटीपीसीआर चाचण्यांच्या बाधित दर (पॉझिटीव्हीटी रेट) मागील आठवड्यात जवळपास आठ टक्के इतका झाला आहे. हा दर असाच वाढत राहिल्यास जिल्ह्यात पुन्हा अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद करावे लागतील.

त्यामुळे कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन कऱण्यास प्रवृत्त कऱणे आणि असे करण्यास टाळाटाळ कऱणाऱ्या व्यक्ती आणि आस्थापनांवर कारवाई करणे याकडे तालुका यंत्रणांनी लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली. लग्न समारंभ व इतर सार्वजनिक कार्यक्रमांच्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन केले जात असल्याच्या नागरिकांकडून तक्रारी येत आहेत.

तालुका यंत्रणांनी अशा तक्रारींची तात्काळ दखल घेऊन कारवाई कऱणे अपेक्षित आहे. तसेच बाधित रुग्णांच्या निकट संपर्कातील सर्वांच्या आरटीपीसीआर चाचण्या घ्याव्यात, असे निर्देश भोसले यांनी महानगरपालिका यंत्रणेला दिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe