राज्यातील सरकारी कर्मचारी आणि शिक्षक वर्गासाठी मोठी सकारात्मक बातमी समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या आणि भत्त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे मोठी नाराजी व्यक्त केली जात होती. अखेर, सरकारने याकडे लक्ष देत महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महागाई भत्ता ५० टक्क्यांवरून ५३ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. हा सुधारित महागाई भत्ता १ जुलै २०२४ पासून लागू होणार असून, या वाढीची थकबाकीही कर्मचाऱ्यांच्या वेतनात जमा केली जाईल.

सरकारच्या या निर्णयाचा सुमारे १७ लाख सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांना मोठा लाभ होणार आहे. फेब्रुवारी महिन्यातच कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन मिळणार असल्याने त्यांच्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतनवाढीबाबत प्रलंबित मागण्या होत्या. सरकारच्या विविध आर्थिक निर्णयांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना डावलले जात असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी वारंवार केला. महागाईने उच्चांक गाठल्याने, सरकारने इतर योजना आणि मदतीसाठी मोठ्या प्रमाणात निधी वितरित केला,
मात्र सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांच्या वेतनवाढीकडे दुर्लक्ष होत होते. त्यामुळे संघटनांनी सरकारवर दबाव वाढवला आणि महागाई भत्ता वाढीची मागणी जोर धरू लागली. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार घरभाडे भत्त्यातही वाढ करावी, अशी मागणी कर्मचारी संघटनांनी केली होती.
महागाई भत्त्यातील वाढ ही कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार ही वाढ करण्यात आली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक उत्पन्नात थोडीशी वाढ होईल आणि त्यांना महागाईशी लढण्यास मदत मिळेल.
यासोबतच, सरकारने १ जुलै २०२४ ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीतील थकबाकीही फेब्रुवारी २०२५ च्या वेतनासोबत रोखीने अदा करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढ मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.