अमेरिकन एअरलाईन्सचे एक विमान उंच हवेत उडत असताना अचानक १५ हजार फूट खाली आल्याने प्रवाशांमध्ये एकच थरकाप उडाला; पण वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमानाचे सुखरूप लँडिंग केल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. विमान खाली आल्यानंतर उडालेल्या खळबळीचा व्हिडीओ एक प्रवाशाने सोशल माध्यमावर टाकला आहे.
अमेरिकन एअलाईन्सच्या विमानासोबत हा प्रकार १० ऑगस्ट रोजी घडला. विमानाने उत्तर कॅरोलिनाच्या शार्लोट येथून फ्लोरिडाच्या गेनेसविलेच्या दिशेने उड्डाण भरले होते; पण ४३ मिनिटांच्या प्रवासादरम्यान हे विमान अवघ्या तीन मिनिटांत १५ हजार फूट खाली आल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.
हे विमान ६ मिनिटांत १८,६००, तर ११ मिनिटात २० हजार फुटांपर्यंत खाली आले. विमानात दबाव निर्माण होऊन ऑक्सिजन मास्क बाहेर आल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली होती.
प्रवासी ऑक्सिजन मास्कद्वारे श्वास घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा एक व्हिडीओ एक प्रवाशाने सोशल माध्यमावर टाकला; पण संकटाच्या स्थितीत वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमानाचे गेनेसविले विमानतळावर सुखरूप लँडिंग केले.
यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला; पण घटना कशामुळे घडली, यामागचे कारण स्पष्ट करण्यात आले नाही. एअरलाईन्सने घडलेल्या प्रकाराबद्दल प्रवाशांची माफी मागत वैमानिक दलाचे आभार मानले.