अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- कोरोना संसर्गाची तीव्रता कायम असताना आता भविष्यामध्ये हे संकट अधिक गहिरे होण्याची शक्यता आहेदक्षिण आफ्रिका आणि अन्य काही देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे.
हा विषाणू वेगाने पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. लसीकरणानंतरही या व्हेरिएंटचा संसर्गाचा धोका असल्याने चिंता वाढली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकबल डिजीस आणि क्वाझुलु नेटाल रिसर्च इनोव्हेशन अँड सिक्वेन्सिंग प्लॅटफॉर्मच्या शास्त्रज्ञांना पहिल्यांदा या विषाणूची माहिती मिळाली होती.

या विषाणूच्या व्हेरिएंटला C.१.२ असं नाव दिलं गेलं. दक्षिण आफ्रिकेत नव्या व्हेरिएंटने प्रभावित लोकांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट C.१.२ हा चीन, कांगो, मॉरिशस, इंग्लंड, न्यूझीलंड, पोर्तुगाल, स्वित्झर्लंडमध्ये १३ ऑगस्टपर्यंत आढळून आला आहे.
२४ ऑगस्टला प्रीप्रिंट रिपोजिटरी वर एक अहवाल जारी करण्यात आला होता. त्यात C.१.२ हा व्हेरिएंट C.२ च्या तुलनेत अधिक घातक असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे नव्या व्हेरिएंटबाबत चिंता वाढली आहे. दरम्यान देशात गेल्या अनेक दिवसांपासून करोना रुग्णांची संख्या ४० हजारांपेक्षा कमी होती.
मात्र, २६ ऑगस्टपासून करोनाबाधितांची संख्या सातत्याने ४० हजारांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे करोना कमी होतोय ही भावना मनात ठेवून निष्काळजीपणा न करता खबरदारी घेणं गरजेचं झालंय.
२६ ऑगस्ट रोजी बुधवारी देशात आधीच्या रुग्णसंख्येत तब्बल २३ टक्क्यांची वाढ होऊन ४६ हजार १६४ करोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती तसेच ६०७ जणांचा मृत्यू झाला होता.
त्या तुलनेने देशातील आजची रुग्णसंख्या थोडी कमी आहे. देशात गेल्या २४ तासांत करोनाचे ४२ हजार ९०९ रुग्ण आढळले आहेत. तर ३८० जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या ३ लाख ७६ हजार ३२४ रुग्ण उपचाराधीन आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम