अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2021 :- जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना वेगाने पसरू लागला आहे. यामुळे प्रशासन देखील सतर्क झाले आहे. यातच नगर जिल्ह्यातील दोन शाळांमध्ये मिळून २७ विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाली आहे.(Omicron News)
तर दुसरीकडे ओमिक्रॉनचाही प्रसार वाढत असल्याने राज्य सरकारने काही निर्बंध लागू केले आहेत. या पार्श्वभूमीवर शाळांबाबत काय निर्णय घेण्यात येणार यासंबंधी खुद्द शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
नेमक्या काय म्हणाल्या शिक्षणमंत्री? राज्यातील शाळांसंबंधी कोणताही निर्णय आता सरसकट घेतला जाणार नाही, तर स्थानिक परिस्थिती पाहून स्थानिक प्रशासनाला निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत,
असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. दरम्यान संगमनेरमध्ये महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांसाठी वर्षा गायकवाड आज आल्या होत्या.
त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, ‘गेल्या काही काळापासून शालेय विद्यार्थ्यांना करोनाची बाधा होण्याचे प्रकार वाढले आहेत, हे दिसून येत आहे.
मात्र, या सर्व घडामोडींवर शिक्षण विभाग आणि स्थानिक प्रशासनाचं बारकाईनं लक्ष आहे. मुळात शाळांसंबंधी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनाच यासाठी पुरेशा आहेत.
त्यामध्ये अतिशय बारकाईने विचार करण्यात आला असून कोणत्या परिस्थिती काय निर्णय घ्यायचे याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
त्यानुसार जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी स्थानिक पातळीवर परिस्थिती हाताळत आहेत. स्थानिक परिस्थितीनुसार शाळा सुरू ठेवणे, बंद करणे किंवा आणखी काही उपाययोजना करणे याचे निर्णय घेतले जातील.
त्यामुळे यापुढे राज्य पातळीवरून सरसकट निर्णय घेतले जाणार नाहीत. त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार निर्णय घेतले जातील. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही किंवा त्यांच्या आरोग्याशी तडजोडही केली जाणार नाही.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम