15 दिवसात 6 गाईंचा मृत्यू; पशुपालकांची चिंता वाढली

अहमदनगर Live24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :- कोरोना महामारीशी मनुष्यांचा लढा सुरु असताना पशुधनांमध्ये देखील रोगराईचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे अनेक जनावरे दगावली आहे.

नुकतेच लाळ्या खुरकत, घटसर्प याच आजाराने अस्तगाव येथे पंधरा दिवसांत 6 गायींसह एक कालवड दगावली आहे. त्यामुळे परिसरातील पशुपालकांची चिंता वाढली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, अस्तगाव येथे 7 सप्टेंबरला बाळासाहेब तुकाराम सालपुरे यांची गाय या आजाराने दगावली. त्यानंतर किसन भागवत नळे यांची एक गाय 13 सप्टेंबरला दगावली.

20 सप्टेंबरला तुकाराम विश्राम आरंगळे यांची एक गाय व तीची कालवड दगावली. सुनील लहानु सापते यांची एक कालवड काल दगावली तर चोळकेवाडीचे पोलीस पाटील प्रदीप धोंडिराम चोळके यांची एक गाय व एक कालवड काल दगावली. असे सहा गायी व एक कालवड लाळ्या खुरकत व घटसर्प या आजाराने दगावली आहे.

पशुधनांमध्ये रोगराईचा प्रादुर्भाव वाढला असल्याने जनावरांचे लसीकरण हाती घेण्यात आले आहे. दरम्यान अस्तगाव भागातील 3129 व चोळकेवाडी येथील 1285 जनावरांना लाळ्या खुरकत, घटसर्प रोगप्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे. तरीही काही गायी लसीकरण होऊनही दगावल्या आहेत.

त्यामुळे पशुपालक धास्तावले आहे. दरम्यान पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत प्राण्यांचे शवविच्छेदन करून नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. या प्रकाराची गंभीर दखल घेत पशुवैद्यकीय यंत्रणा कामाला लागली आहे.