अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- मागेल त्याला हक्काचे घर या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेला लोणी बुद्रूक ग्रामपंचायतीने प्रत्यक्ष कृतीत उतरवून ६० कुटूंबियांना आहे त्याच जागेवर हक्काच्या घराचा आधार मिळवून दिला आहे. भाजप नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साकार झालेला सिंधूताई विखे पाटील निवा-याचा पथदर्शी गृहप्रकल्प देशापुढे ग्रामीण विकासाचा अनोखा उपक्रम ठरला आहे.
लोणी बुद्रूक गावात शासकीय जागेवरच आदिवासी व इतर समाजातील कुटूंब गेली अनेक वर्षांपासुन राहात होती. पंचायत समितीच्या माध्यमातून शासकीय योजनेतील घरकुल या कुटूंबियांना मंजुरही होत होती. परंतू सदरची जागा त्यांच्या नावे नसल्याने मंजुर झालेली घरकुल सातत्याने रद्द झाली.
या रहिवाश्यांना घराची उपलब्धता नसल्यामुळे नैसर्गिक आपत्तीतही मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. या कुटूंबियांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घेतला. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सदर शासकीय जागा रहिवाश्यांच्या नावे करण्यासाठी प्रस्ताव तयार करुन त्यास मंजुरी मिळविली.
जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच इतर विभागांचे ना हरकत दाखल मिळविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांनीही पाठपुरावा केल्याने रहीवाश्यांना त्यांच्या हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
या घरांसाठी प्रधानमंत्री निधी उपलब्ध म्हणून आ.विखे पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना व शबरी आवास योजनेतून एका घरासाठी १ लाख २० हजार रुपये तसेच शौचालयासाठी प्रतिकुटूंब १२ हजार रुपयांचे अनुदान मंजुर झाले. त्यातच या प्रकल्पात प्राधान्यांने गवंडी प्रशिक्षण योजनाही राबविण्यात आल्याने याच रहिवाश्यांना रोजगाराची संधी मिळाली.
या व्यतिरिक्त जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून व पंडित दिन दयाळ योजने अंतर्गत रस्त्यांकरीता ४५ लाख व भूमिगत गटारी आणि पाईपलाईन करीता ५ लाख रुपये असा एकुण ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याने हा गृहप्रकल्प सर्व सुविधांनी परिपूर्ण झाला आहे.
याच परिसरात विद्यार्थ्यांसाठी अंगणवाडी, समाजमंदिराची उभारणी करण्यात आली आहे. प्रत्येक कुटुंबासाठी ५०० लिटर पाण्याची टाकी दिल्याने नळाव्दारे पाणी मिळण्याची सुविधाही या कुटुंबांना उपलब्ध झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात मागेल त्याला घर देण्याच्या केलेल्या घोषणेला मुर्त स्वरुप देतानाच आ.विखे पाटील यांनी गृहनिर्माण मंत्री असताना या प्रकल्पाला नवी दिशा देत साकार केलेला हा गृहप्रकल्प संपूर्ण देशासाठीच पथदर्शीच ठरला आहे. कारण आहे त्याच जागेवर रहिवाश्यांना हक्काचे घर मिळवून देण्याची प्रक्रीया ही प्रथमच घडल्याने ६० कुटुंबियांना हक्काच्या घरामुळे स्थिरता मिळाली आहे.
आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या गृहप्रकल्पाचा लोकार्पन सोहळा मंगळवारी साध्या पध्दतीने संपन्न होत असून, रहिवाश्यांना त्यांच्या हक्काच्या घराची चावी सूपुर्त केली जाणार आहे.
या घरकुलांसाठी प्रशासकीय स्तरावर झालेले निर्णय आणि सुमारे दिड कोटी रुपयांचा उपलब्ध झालेल्या निधीतून साकारलेला हा गृहप्रकल्प एक पथदर्शी प्रकल्प म्हणून निर्माण झाला आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वरिष्ठ आधिका-यांनी या प्रकल्पाची पाहाणी करुन, मार्गदर्शक सुचना केल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागेल त्याला हक्काचे घर देण्याबाबत केलेल्या घोषणेला कृतीत उतरविता आल्याचे मोठे समाधान आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम