शिक्षकांच्या प्रत्येक महिन्याच्या वेतन विलंबाचा प्रश्‍न सोडवण्याची मागणी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :- शिक्षकांच्या प्रत्येक महिन्याच्या वेतन विलंबाचा प्रश्‍न सोडवून, केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात झालेली 11 टक्के वाढ राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना विनाविलंब देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अध्यक्ष उल्हास वडोदकर, कार्यवाह शिवनाथ दराडे, संघटनमंत्री सुहास हिर्लेकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांना देण्यात आल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

सातव्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 11 टक्के वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार केंद्र सरकारी कर्मचारी आणि सेवानिवृत्तांना 1 जानेवारी 2020 पासून 4 टक्के, 1 जुलै 2020 पासून 3 टक्के आणि 1 जानेवारी 2021 पासून 4 टक्के असा एकूण 11 टक्के महागाई भत्ता दिला जाणार आहे.

केंद्राप्रमाणे महागाई भत्ता वाढ राज्यातही देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. मात्र हा निर्णय उशारा होत असल्याने थकबाकी शिल्लक राहण्याचे प्रमाण वाढले आहे. जुलै ते नोव्हेंबर 2019 च्या कालावधीत 5 टक्के दराने 5 महिन्यांची थकबाकी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना मिळालेली नाही.

त्यामुळे 5 टक्के थकबाकी तसेच केंद्र सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणे 11 टक्के वाढीव महागाई भत्ता विनाविलंब देण्याचा शासन निर्णय घ्यावा. तसेच प्रत्येक महिन्याला शिक्षक शिक्षकेत्तर यांचे वेतन उशिरा होते. प्रत्येक महिन्याला वेतन अनुदान मंजूर होत असल्याने प्रशासकीय कार्यवाहीला वेळ जातो.

त्यामुळे किमान चार महिन्यांचे वेतन अनुदान एकदम मंजूर करावे आणि शिक्षकांची वेतन विलंबाची समस्या सोडवण्यासाठी निर्देश देण्याची मागणी शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेणुनाथ कडू,

कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार, राज्य महिला आघाडी प्रमुख पुजाताई चौधरी, नरेंद्र वातकर, किरण भावठाणकर, माजी अध्यक्ष बाबासाहेब काळे, माजी आमदार भगवान अप्पा साळुंखे, संजीवनीताई रायकर आदी राज्य कार्यकारणी सदस्य प्रयत्नशील आहेत.

केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता 17 टक्के पासून 28 टक्के पर्यंत वाढवण्यात आल्याचा गाजावाजा केला जात आहे. मात्र हा महागाई भत्ता गेल्या अठरा महिन्यांपासून देय होता.

जानेवारी 2020 पासून 3 टक्के, जुलै 2020 पासून 4 टक्के, जानेवारी 2021 पासून 4 टक्के, आणि जुलै 2021 पासूनचा अद्याप जाहिर झालेला नाही. 1 जुलै पासून हा महागाई भत्ता लागू करण्यात आला असून, गेल्या अठरा महिन्याची रीतसर रक्कम अदा करण्यात आली नाही.

याद्वारे सरकारची अंदाजे कोट्यावधी रुपयांची बचत झाली आहे. संपूर्ण कोवीड लसीकरणसाठी वर्तमान आर्थिक वर्षाची तरतूद सुमारे 35 हजार करोड रुपयाची आहे. केंद्र व राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांनी अशा प्रकारे 130 करोड भारतीयांच्या लसीकरणाचा कार्यक्रम एका अर्थाने प्रायोजीत केला आहे. -बाबासाहेब बोडखे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe