वार्षिक वेतन वाढ देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्याची शिक्षक परिषदेची मागणी

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- 30 जूनला सेवानिवृत्त होणार्‍या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना 1 जुलै रोजी देय असलेली वार्षिक वेतन वाढ देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड, मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठविले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

शिक्षक कर्मचारी यांची 1 जुलै ते 30 जून या एक वर्षाच्या कालावधीत दिलेली सेवा विचारात घेऊन 1 जुलैला वार्षिक वेतनवाढ ठरते. परंतु 30 जूनला सेवानिवृत्त होणार्‍या शिक्षक कर्मचारी यांना 1 जुलैला देय असलेली वार्षिक वेतनवाढ देण्यात येत नाही.

याविरुद्ध उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात कर्मचार्‍यांनी दाखल केलेले याचिका उच्च न्यायालयाने मान्य करुन वार्षिक वेतनवाढची मान्यता कायम केली.

त्या आधारावर केंद्र शासनाने शासन निर्णय निर्गमित करुन 30 जूनला सेवानिवृत्त होणार्‍या कर्मचार्‍यांना 1 जुलै ची वार्षिक वेतनवाढ देय ठरविली आहे.

त्याच धर्तीवर 30 जूनला सेवानिवृत्त झालेल्या तसेच सेवानिवृत्त होणार्‍या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना 1 जुलैला वार्षिक वेतनवाढ देय ठरविण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद व लोकप्रतिनिधी या नात्याने वारंवार निवेदने देण्यात आली.

परंतु निवेदनाची दखल घेण्यात आली नसल्याचे खेद शिक्षक आमदार गाणार यांनी निवेदनाद्वारे व्यक्त केला आहे. 30 जूनला सेवानिवृत्त होणार्‍या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना 1 जुलै रोजी देय असलेली वार्षिक वेतन वाढ देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्याची मागणी शिक्षक परिषदने केली आहे.

या मागणीसाठी शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेणुनाथ कडू, माजी अध्यक्ष बाबासाहेब काळे, नरेंद्र वातकर, किरण भावठाणकर, मुंबई विभाग कार्यवाह शिवनाथ दराडे, महिला आघाडी प्रमुख पुजाताई चौधरी आदी प्रयत्नशील आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News