अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- जीवे मारण्याचा प्रयत्न केलेल्या राहुरी येथील पोलीस कर्मचारी व त्याच्या मुलाकडून स्वत:च्या व कुटुंबीयांच्या जीवितास धोका असून, सदर कर्मचारी पोलीस असल्याचा गैरफायदा घेत पिस्तोलचा धाक दाखवित असल्याने त्याचे निलंबन करण्याची मागणी तक्रारदार विजय वाघ यांनी पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तर सदर पोलिसाचे कुटुंबीय पोलीस वाहनचे घरगुती कामासाठी वापरत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तांदुळवाडी (ता. राहुरी) येथील रहिवासी असलेले विजय वाघ शेतकरी आहेत. त्यांचे व पोलिस कर्मचारी चाँद जैनुद्दीन पठाण यांच्यात शेत जमीनीवरुन वाद आहेत. पठाण यांनी सन 2017 मध्ये वाघ व त्यांच्या नातेवाईकावर कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. यामध्ये त्यांना अटकपुर्व जामीन मिळाला.
सदर पोलिस कर्मचारी वाघ यांना सतत शिवीगाळ करत असल्याने पोलिस कर्मचारी व त्याच्या कुटुंबीयांविरोधात दोन वेळेस अदखलपात्र गुन्हा दाखल केला. याचा राग येऊन राहुरी कृषी विद्यापिठ येथे 2 डिसेंबर 2017 रोजी पोलिस कर्मचारी पठाण यांची पत्नी, मुलगा व इतर नातेवाईकांनी वाघ यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता.
यावेळी शिर्डी मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे राहुरी येथून जात असताना जखमी झालेले वाघ यांना तत्पर रुग्णवाहिका बोलून राहुरी ग्रामीण रुग्णालयात पाठवले. परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. ते शुद्धीवर आल्यानंतर झालेला प्रकार सांगितला. नगर येथील तोफखाना पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी यांनी त्यांचा जबाब घेतला.
सदर प्रकरणी राहुरी पोलीस स्टेशनला पोलिस कर्मचारी पठाण यांची पत्नी दिलशा पठाण, त्यांचा मुलगा साहिल पठाण व नातेवाईक शौकत पठाण व इतर प्रितम देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तत्कालीन तपासी अंमलदार व तपासी कर्मचारी यांनी योग्य पध्दतीने तपास न करता आरोपी पोलीस असल्याने संगणमत करून असा कुठलाही गुन्हा घडला नसल्याचे राहुरी न्यायालयाची दिशाभूल करून ब समरी चार्जशीट पाठविले.
न्यायालयात विजय वाघ यांनी चकरा मारून 326 प्रमाणे गुन्हा दाखल केला. जिल्हा सत्र न्यायालयात ही पाच महिने खटला चालला. सर्व आरोपींना कोर्टाची दिशाभूल केली व न्यायालयाने 2 सप्टेंबर रोजी फिर्यादीच्या बाजूने हा खटला राहुरी न्यायालयात चालवण्यात सांगितले. तर न्यायालयाने पाच हजार रुपये दंड आरोपींना केला व तो कोर्टात जमा करून, फिर्यादीला देण्यास सांगितले.
तसेच सत्र न्यायालयाने आरोपींना हजर करून हा खटला चालविण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे सदर पोलीस कर्मचारी व त्याच्या कुटुंबीयावर गुन्हा दाखल झाला आहे. या पोलिस कर्मचारीचे वाळू माफिया, गुंड प्रवृत्तीच्या लोकांशी संपर्क असल्याने तो सुड घेण्याच्या उद्देशाने पुन्हा मला व माझ्या कुटुंबीयांवर हल्ला करण्याची शक्यता असल्याचे तक्रारदार वाघ यांनी निवेदनात म्हंटले आहे.
या खटल्याचा निकाल लागे पर्यंत सदर पोलिसाचे निलंबन करावे, त्याचा मुलगा वडिलांची पिस्तोल व पोलिस वाहनाचा दुरोपयोग करीत असल्याने त्याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी वाघ यांनी केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम