शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम आठ दिवसांत जमा करा !

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :-  नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून विमा कंपन्यांकडे प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांच्या विम्याच्या प्रस्तावांबद्दल राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे.

कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी तातडीची बैठक घेऊन विमा कंपन्यांना धारेवर धरले आहे. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करुन येत्या आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर विम्याची रक्कम जमा करण्याचे निर्देश कृषिमंत्र्यांनी दिले आहेत.

शेतकऱ्यांच्या विम्याच्या प्रश्नावर ‘पाहू, करु’ अशी भूमिका घेऊन चालढकल करून विम्याचे पैसे शेतकऱ्यांना न मिळाल्यास विमा कंपन्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही कृषिमंत्री भुसे यांनी दिला आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये गेल्या तीन वर्षात विविध विमा कंपन्यांनी केलेल्या कार्यवाहीचा गुरुवारी मंत्रालयात आयोजित बैठकीत कृषिमंत्री दादा भुसे यांनी आढावा घेतला.

या बैठकीला कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार यांचेसह आयसीआयसीआय लोम्बार्ड, रिलायन्स, इफ्को टोकियो, एचडीएफसी एर्गो, बजाज अलियांझ, एआयसी ऑफ इंडिया या विमा कंपन्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.