मुंबई : भाजप (BJP) नेते आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांचा २ तास जबाब पोलिसांकडून नोंदवण्यात आला आहे. फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मुंबई सायबर पोलिसांचं (Mumbai Cyber Police) पथक २ तास देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करत होते.
यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, राज्यात बदल्यांचा महाघोटाळा झाला आहे. याची सगळी माहिती मी केंद्रीय गृहसचिवांपर्यंत (Union Home Secretary) पोहोचवली. त्यानंतर हायकोर्टाने (High Court) या घोटाळ्याची चौकशी सीबीआयला सोपवली.
त्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. याचा अर्थ हा घोटाळा घडला. मात्र, या घोटाळ्याची चौकशी सरकार करू शकत नाही.
मी जर हा घोटाळा काढला नसता, तर कोट्यवधी रुपयांचा घोटाळा दबून गेला असता, असा खळबळजनक दावा फडणवीसांनी केला आहे.
मला पोलिसांनी प्रश्नावली पाठवली होती. मी त्यांना पत्र दिले होते. मी त्याचे उत्तर देणार असे कळवले होते. त्यांनी हजर राहण्याबाबत नोटीस पाठवली.
मात्र, ही नोटीस अचानक येण्याचे कारण सभागृहात मी जे विषय मी मांडतोय किंवा दाऊदशी असलेले संबंध असतील.
त्यामुळे मला नोटीस पाठवण्यात आली. कालच मी जाणार असे सांगितले होते. मग पोलिसांकडून आम्हीच आपल्याकडे चौकशीसाठी स्टाफ पाठवतो, अशी विनंती करण्यात आली. त्यानुसार ते आज आले. असेही फडणवीस म्हणाले.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, वळसे- पाटील साहेब जे म्हणाले त्याच्यात फरक काय आहे. मला जे प्रश्न पाठवले होते आणि आज जी चौकशी झाली, त्यात फरक आहे.
ऑफिशिअल सीक्रसी अॅक्टचे उल्लंघन केल्याचा आरोप माझ्यावर केला जातोय. जणू काही मला आरोपी-सहआरोपी बनवता येईल का, असे प्रश्न मला विचारण्यात आले. मी स्पष्टपणे त्यांना उत्तरे दिली.
गोपनीय कायदा लागू होतो की नाही, यावर मी बोलणार नाही. मात्र, व्हिसल ब्लोअर अॅक्ट लागू झाला पाहिजे. मी व्हिसल ब्लोअर आहे.. न्यायालयाने मान्य केलेला घोटाळा आहे असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.