मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार आल्यापासून भाजप (BJP) नेत्यांकडून अनेक वेळा त्यांना डिवचण्याचा प्रयत्न सुरु असतो. आता भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारला पुन्हा एकदा डिवचले आहे.
मी मुंबई अभियान आणि शिव कल्याण केंद्राच्यावतीने मोबाईल दवाखाने (Mobile clinics) सुरु करण्यात आले आहेत. याचे लोकार्पण देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल चढवला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील आघाडी सरकार चालत नाही, बोलत नाही अन् हलतही नाही. त्यामुळेच आपल्याला असे चालते फिरते दवाखाने सुरू करावे लागत आहेत असे म्हणत त्यांनी आघाडीवर निशाणा साधला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, चालता फिरता दवाखाना सुरू होत आहे. दक्षिण मध्य मुंबईत या व्हॅन रोज जाणार आहेत. या व्हॅनमध्ये प्रशिक्षित डॉक्टर असतील. लोकांच्या दारापर्यत हे काम होणार आहे.
रुग्ण सेवेचे महत्त्व आपण पाहिलेच आहे. कोविड काळात मुंबईत (Mumbai) एकाच बेडवर पेंशट आणि रुग्ण आपण पाहिले. त्यामुळेच मोबाईल दवाखाने उपयोगी ठरणार आहेत असेही फडणवीस म्हणाले आहेत.
आरोग्य सेवेचा खर्च वाढत आहे. त्यामुळे हा खर्च लोकांना परवडत नाहीये. अधिवेशनात आम्ही सरकार आणि पालिका दवाखान्याची परिस्थिती पाहिली. पालिका मागील वर्षात एकही औषध विकत घेऊ शकले नाही.
जेजेमध्ये (JJ) देखील पॅरासिटीमॉल (Paracetamol) बाहेरून घ्यावी लागत आहे. त्यामुळे सामान्य माणसाची परवड होत आहे. रुग्ण सेवेवर खर्च करण्यापेक्षा चौक सुशोभीकरणावर खर्च करून मलिदा कसा खाता येईल हे सुरू आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.