Maharashtra news:राज्यातील सत्तांतर काही एका रात्रीतून घडले नाही. मागील दीड वर्षापासून त्याची पटकथा लिहिली जात होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः विधानसभेत याची कबुली दिली आहे.
त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनीही त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. “देवेंद्र रात्रीच्या वेळी वेशांतर करून घराबाहेर पडायचे. ते चष्मा व हुडी घालून जात असत. त्यामुळे बऱ्याचदा मलाही ते ओळखायला येत नव्हते.
मी त्यांना ‘तुमचे काय सुरू आहे?’ असे विचारले तर ते कोणतेही उत्तर न देता काढता पाय घ्यायचे,’ असे अमृता यांनी म्हटले आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी अमृता फडणवीस यांनी वार्तालाप केला.
त्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वेशांतरासोबतच भाजप परत सत्तेत येण्याची शक्यता वाटत होती असे म्हटले.
ठाकरेंना टोला : ठाकरे कुटुंबीयांविषयी पूर्वीच खूप बोलल्यामुळे नवीन काही सांगण्यासारखे नाही, असे अमृता म्हणाल्या. ठाकरे कुटुंबीयांना आता काही सांगायची माझी इच्छा नाही. मला जे सांगायचे होते ते मी दोन अडीच वर्षांपूर्वी खूप काही सांगितले आहे. मी त्यांना फक्त एवढेच सांगेन की, ‘सक्षम लोक कायम टिकतात, प्रतिकूल परिस्थिती कायम राहत नाही,’ अशी टीकाही त्यांनी केली.
भाजपची सत्ता परत येणार, असे नेहमीच वाटायचे
अमृता म्हणाल्या, राज्याची स्थिती कोलमडणे, इगो राइट्स, लोकांची घरे तोडणे, हनुमान चालिसा, लोकांच्या समस्या, एसटी कर्मचारी असो की ओबीसी आरक्षण आदी विविध कारणे असो, त्यामुळे मलाही भाजपची सत्ता परत येणार हे वाटतच होते.
देवेंद्र मुख्यमंत्री म्हणून येतील असे सर्वांनाच वाटत होते, पण ते उपमुख्यमंत्री झाले. यावर अमृता म्हणाल्या की, मला थोडे आधीपासून समजले होते की, देवेंद्र मुख्यमंत्री होणार नाहीत. त्याशिवाय ते कोणतेही पद स्वीकारणार नाही हेही मला माहीत होते, असेही अमृता फडणवीस यांनी स्पष्ट केले.