देशातील व राज्यातील परिस्थिती पाहून सर्वसामान्य लोकांमध्ये अस्वस्थता

Ahmednagarlive24 office
Published:
Pratap Dhakane

Pratap Dhakane : सध्याच्या राजकीय परिस्थिीने लोकांच्या मनात संताप आहे. लोकभावना समजावून घेऊन लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी व त्यांना मनमोकळे करण्यासाठी व्यासपीठ मिळावे, यासाठी ‘गाव चलो घर चलो’ अभियानाचे आयोजन केले आहे. प्रत्येक गावात जाऊन जनतेच्या भावना समजावून घेण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याची माहिती प्रताप ढाकणे यांनी दिली.

या वेळी बोलताना ढाकणे म्हणाले, देशातील व राज्यातील परिस्थिती पाहून सर्वसामान्य लोकांमध्ये अस्वस्थता दिसते. या परिस्थितीमुळे लोकांच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांना उत्तरे मिळत नाहीत. लोकांच्या भावना समजावून घेतल्या नाही तर लोकभावनांचा स्फोट होऊ शकतो.

या नकारात्मक वातावरणात लोकांच्या संवेदना व भावना समजून घेण्यासाठी लोकांना व्यक्त होण्यासाठी संधी मिळावी, या उद्देशाने ‘ गाव चलो घर चलो ‘अभियानाचे आयोजन केले आहे. हे अभियान राजकीय किंवा मतांसाठी नाही. सामाजिक क्षेत्रात काम करताना लोकांच्या जनभावना समजून नाही घेतल्या तर अधिकचे प्रश्न निर्माण होऊ शकतात.

त्यामुळे सर्वसामान्य लोकांशी थेटपणे हितगुज करण्यासाठी आम्ही दररोज मतदारसंघातील सात ते आठ गावांना भेटी देणार आहोत. देशात व राज्यातील परिस्थितीबाबत लोकांना काय वाटते. लोकांना नेमके काय हवे आहे. त्यांच्या प्रश्नांचे उत्तरे शोधण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.

शासनाच्या येऊ घातलेल्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे गोरगरिबांच्या मुलांचे खूप मोठे नुकसान होणार आहे. २००५ नंतरच्या सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना सरकार नेमके का लागू करत नाही, खते बी बियाण्याचे वाढलेले भाव, मोफत वीज देण्याच्या आश्वासनाचे काय झाले.

सन २१-२२ मध्ये पाथर्डी शेवगाव मतदारसंघातील अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचे काय झाले, शेतीमालाचा बाजार भाव, गॅस, पेट्रोल डिझेल, यासह जीवन आवश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत.

मोदी सरकारच्या काळात सरकारी मालकीच्या नफ्यातील कंपन्या भांडवलदारांना विकण्याचा उद्देश काय, काळा पैसा परत आणण्याचे, सर्वसामान्यांच्या खात्यावर १५ लाख रुपये टाकण्याचे नेमके काय झाले, असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहेत.

सध्याच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीबाबतही लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत हे प्रश्न समजावून घेण्यासाठी ‘गाव चलो घर चलो’ अभियानांतर्गत लोकांशी हितगुज करणार असल्याचे ढाकणे म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe