अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Ahmednagar News :- कुठल्याही शहराची निर्मिती करताना नगररचना विभाग महत्वाची भूमिका बजावतो. रस्ते कुठून असावे, पार्किंगची व्यवस्था कशी असावी यासह अनेक बाबी असतात. मात्र, या नियमांना डावलले जात असल्याचे दिसून येत आहे.
सध्या राहुरी शहरात खासगी जाहिरातदारांच्या फलकबाजीमुळे शहराच्या सौंदर्याचे विद्रुपीकरण झाले आहे. शहरात सर्वत्र भाऊंचा वाढदिवस अन खाजगी क्लासेच्या बॅनरबाजीमुळे शहराचे विद्रुपीकरण झाले आहे.

अगदी जेथे नगरपालिकेच्या स्वच्छताविषयीच्या जाहिराती भिंतीवर झळकल्या, अगदी तेथेच काही खासगी जाहिरातदारांनी आपल्या जाहिरातीचा टेंभा मिरविल्याने शहर विद्रुप होत आहे.
याकडे स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. तसेच शहरात अनेकदा राजकीय फ्लेक्सबाजी होत असते. खरं पाहिले तर प्रत्येक पक्षातील नेत्यांनी ठरवले तर आपले शहर सुंदर शहर म्हणून ओळख निर्माण करू शकते.
मात्र, शहरात सर्रासपणे नेत्यांचीच बॅनरबाजी चालू असते. त्यामुळे शहर विद्रुपीकरणात नेत्यांचाही मोठा हातभार दिसून येत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
दरम्यान तत्कालीन नगराध्यक्ष व विद्यमान राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राहुरीचे नगराध्यक्ष असताना राहुरी शहरवासियांना स्मार्टसिटीचे स्वप्न दाखविले होते.
त्यादिशेने त्यांनी दमदार पावलेही टाकलेली आहेत. दोनवर्षे नगराध्यक्ष पदावर असताना त्यांनी राहुरी शहरात भरीव कामे केली. प्राजक्त तनपुरे हे राज्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार सोडला.
त्यानंतर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. राहुरी शहर स्मार्टसिटीच्या ऐवजी फलकांचे शहर बनले. या शहराच्या सौंदर्याला खीळ घालणार्या या जाहिरातदारांना आवर घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पालिका प्रशासनाने या जाहिराती तातडीने काढून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याचीही मागणी होत आहे.