अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- जिल्ह्यात आता अत्यावश्यक सेवा बरोबरच किराणा दुकाने आणि इतर काही घटकांना सकाळी ७ ते सकाळी ११ या वेळेत व्यवहार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढून पुन्हा कोरोना प्रादुर्भाव वाढणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घ्यावी.
कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन होईल, यासाठी सर्व *संबंधित यंत्रणांनी जागरूक राहावे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना आणि व्यक्तीवर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी दिले आहेत.
कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याची सूचना त्यांनी केली. जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी आज तालुकास्तरीय यंत्रणांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून कोरोना उपाययोजना बाबत मार्गदर्शन केले.
अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले, उर्मिला पाटील, पल्लवी निर्मळ, जयश्री आव्हाड, रोहिणी नऱ्हे, जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे,
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनिल पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके हे जिल्हा मुख्यालय तर उपविभाग, तालुकास्तरावरील महसूल, पोलीस, ग्रामविकास, आरोग्य आणि नगरविकास विभागाचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, आपण दैनंदिन चाचण्यांची संख्या आता वाढविली आहे. त्याप्रमाणे काही तालुक्यांत तसेच नगरपालिका क्षेत्रात चाचण्या होत आहेत. आज जिल्ह्याने २५ हजार चाचण्या एकाच दिवशी केल्या आहेत.
आपण काही व्यवहार ठराविक कालावधीत सुरू करण्याची parvagni दिली असली तरी कोरोनाचा धोका अजुन संपलेला नाही. संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचारही आपल्याला करावा लागणार आहे. त्यामुळे, याठिकाणी गर्दी वाढणार नाही,
नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता सर्व यंत्रणांनी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनीही व्यवहार सुरू झाले म्हणून एकाचवेळी गर्दी करणे टाळले पाहिजे, असे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील कोरोना चाचणीचे प्रमाण अजुन वाढले पाहिजे.
बाधित रुग्णाच्या निकट संपर्कातील व्यक्तींच्या आरटीपीसीआर चाचण्या होणे आवश्यक आहे. सध्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण कमी दिसत आहे. ते वाढविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. अद्यापही काही नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रात होणाऱ्या चाचण्यांची संख्या कमी आहे.
त्यामुळे याठिकाणी चाचण्यांची संख्या वाढविण्यात यावी. केवळ सार्वजनिक ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांच्या होणाऱ्या अॅण्टीजेन चाचणी व्यतिरिक्त प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी किंवा बाधित रुग्ण आढळून येणाऱ्या ठिकाणी चाचण्या होणे आवश्यक आहे.
सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतींनी त्यादृष्टीने कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रत्येक तालुक्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या नोडल अधिकारी यांचीही जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आढावा बैठक घेतली. त्यात त्यांनी, नोडल अधिकारी यांना नेमून देण्यात आलेली जबाबदारी,
त्यांनी केलेली कार्यवाही आणि या नोडल अधिकारी यांनी तालुक्याचा दौरा करून नोंदविलेली निरीक्षणे याबाबत चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात हिवरे बाजार पॅटर्न राबवला जात आहे. त्याची अंमलबजवणी प्रत्येक गावात होणे आवश्यक आहे.
त्यादृष्टीने कार्यवाही सुरू करण्यात आली असून विविध गावात पथकांची स्थापना होत असल्याचे उपविभागीय अधिकारी आणि तालुकास्तरीय अधिकारी यांनी सांगितले. अनेक ग्रामपंचायतींनी यासंदर्भातील ठराव करुन कामांना सुरुवातही केली आहे.
उर्वरित गावांतही हे काम सुरु होईल याकडे तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी लक्ष द्यावे. ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागात स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक यांना सोबत घेऊन या पॅटर्नची अंमलबजावणी करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत.
त्याप्रमाणे कार्यवाही करावी, असे ते म्हणाले. जिल्ह्यात १४ ठिकाणी ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारणी करण्यात येणार आहेत. त्यासाठी आवश्यक शेडचे बांधकाम पूर्ण करावे, त्याच्या जवळ किमान ७० बेडस व्यवस्था होईल हे पहावे, असे त्यांनी सांगितले.
संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाची भीती व्यक्त केली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या बाबतीत जिल्ह्यात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सर्वांचा सहभाग असणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. त्यादृष्टीने तालुकास्तरीय यंत्रणांनी त्यांच्या तालुक्यातील बालरोगतज्ज्ञ,
फिजीशियन आदींचा टास्क फोर्स बनवावा, असे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी नमूद केले. तालुक्यांनी सुरु केलेले नियंत्रण कक्ष २४x ७ कार्यान्वित असतील, याकडे लक्ष द्या. तेथे विचारणा करणाऱ्यांना योग्य माहिती मिळेल हे पाहण्याची सूचना त्यांनी केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम