Ladaki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आलीये. ही योजना सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे अर्थातच एका वर्षात अठरा हजाराचा लाभ मिळतोय. आतापर्यंत या योजनेचे एकूण १५ हफ्ते मिळालेत. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर महिलांना या योजनेचे पैसे मिळत असतात.
याचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता काही दिवसांपूर्वीच जमा करण्यात आला होता. तसेच ऑक्टोबरचा हप्ता दिवाळी किंवा भाऊबीज निमित्ताने खात्यात जमा होणार अशी आशा होती. पण अद्यापही अनेक महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे दिवाली, भाऊबीजेचा मुहूर्त हुकला आता नवीन मुहूर्त कोणता राहणार ? असा प्रश्न महिलांना पडला आहे. दरम्यान, आता राज्य सरकारकडून याबाबत माहिती देण्यात आलीये.

ऑक्टोबरचा हप्ता लवकरच जमा होणार असे संकेत मिळत आहेत. ऑक्टोबर महिना संपण्यास आता अवघे काहीच दिवस उरले असून, येत्या आठ दिवसांत सरकारकडून निधी वितरित केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सप्टेंबरचा हप्ता उशिराने म्हणजे ऑक्टोबर महिन्यात वितरित करण्यात आला होता, त्यामुळे ऑक्टोबरचा हप्ता देखील थोडा उशिरा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचबरोबर, लाडकी बहीण योजनेतील केवायसी (KYC) प्रक्रियेलाही तात्पुरता ब्रेक देण्यात आला आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, नगर परिषद आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केवायसी प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. निवडणुका संपल्यानंतर ही प्रक्रिया पुन्हा सुरु होईल. राज्य सरकारने दोन महिन्यांचा कालावधी देऊन सर्व महिलांना केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले होते. सध्या केवायसी स्थगित असली तरी हप्त्यांचे वितरण सुरू राहील, अशी शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत महिलांच्या खात्यात ऑक्टोबरचा हप्ता जमा होण्याची अपेक्षा आहे. नक्कीच असे झाले तर महिलांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.











