जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात पसरतेय कुत्र्यांची दहशत; प्रशासन मात्र निर्धास्त

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- श्रीगोंदा तालुक्यासह शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. शहरातील अनेक भागांत अधूनमधून पिसाळलेल्या कुत्र्याकडून हल्ल्याचे प्रकार घडत असतात. आजवर त्यात कित्येक बालके व नागरिक जखमी झाले आहेत.

मोकाट कुत्र्यांच्या या प्रकारामुळे शहरातील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.ऐककडे हे सगळं सुरु असताना दुसरीकडे प्रशासन मात्र निर्धास्त आहे. श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरामध्ये मागील काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट पहायला मिळत आहे. हे मोकाट कुत्रे रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींना चावा घेत आहेत.

या मोकाट कुत्र्यांनी आतापर्यंत शहरातील पाच ते दहा जणांना चावा घेतला आहे. यामध्ये दोन वृद्ध ,एक महिला तर एका लहान मुलाचा समावेश आहे. या सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शहर व तालुक्यात भटक्या कुत्र्यांच्या उच्छादामुळे नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत.

मात्र याची पर्वा, ना नगरपालिका, ना ग्रामपंचायतीला आहे. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांचा विषय गंभीर बनला आहे पिसाळलेल्या कुत्र्यांनी अनेकांना चावा घेवून जखमी केले आहे. नुकतेच एका जनाला रेबीजची लागण होऊन एका तरुणाचा मृत्यूही झाला आहे.

अशा घटना घडल्यानंतर दोन-चार दिवस त्या परिसरात कुत्री पकडण्याची मोहीम राबविली जाते. त्यानंतर सारे काही शांत होते. भटक्या कुत्र्यांचा बंदोस्त करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची तसेच निर्बिजीकरण केंद्र वाढविण्याची नितांत गरज आहे. गेल्या काही वर्षामध्ये लहान मुलांना मोठ्या प्रमाणात हल्ले झालेले आहेत.

पालिकेला या समस्येवर उपाययोजना करण्यात पूर्णपणे यश आलेले दिसत नाही. भटक्या कुत्र्यांमुळे शहरातील नागरिक हैराण झाले असून त्यासाठी ‘श्वान निर्बिजीकरण’ केंद्रांची आवश्यकता आहे. असे अनेक प्रकार घडत असताना याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नसल्यामुळे मोकाट कुत्र्यांची श्रीगोंदा शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली आहे असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News