तुम्ही मला चुना लावू नका ! पालखी महामार्गाच्या कामांवरून नितीन गडकरी यांनी अधिकारी, ठेकेदारांना झापले

Mahesh Waghmare
Published:

६ जानेवारी २०२५ पुणे : पालखी महामार्गाच्या कामांवरून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. दिवेघाट ते लोणंद आणि पाटस ते पंढरपूर येथील पालखी महामार्गाचे येत्या मे महिन्यापर्यंत काम पूर्ण करा, अन्यथा कारवाई करावी लागेल, असा थेट इशारा राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी तसेच संबंधित ठेकेदाराला पुण्यात दिला.

गडकरी म्हणाले की, ठेकेदार तुम्हाला चुकीची माहिती देऊन चुना लावतात. त्यांचे ऐकून तुम्ही मला चुना लावू नका, असे अधिकाऱ्यांसह ठेकेदारांना खडेबोल सुनावले.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे विविध कार्यक्रमांसाठी शनिवारी पुणे दौऱ्यावर होते.या कार्यक्रमानंतर एका हॉटेलमध्ये ‘एनएचएआय’च्या अधिकाऱ्यांसमवेत पालखी महामार्गाच्या विविध कामांचा आढावा त्यांनी घेतला. या वेळी प्रकल्प अधिकारी संजय कदम आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

हडपसर ते दिवेघाट या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गातील सहावा टप्पा पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्याचे काम नुकतेच सुरू करण्यात आले आहे,अशी माहिती अधिकाऱ्यांनी नितीन गडकरी यांना दिली.

त्या वेळी ‘नागरिकांना वाहतुकीसाठी अडचणी निर्माण होऊ नये, यासाठी येत्या मे महिन्यापर्यंत मार्ग पूर्ण करा,’ अशा सूचना त्यांनी अधिकारी ठेकेदारांना दिल्या.
संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालखी महामार्गांची कामे त्वरित पूर्ण करा.

मार्च महिन्यापर्यंत या महामार्गांची कामे पूर्ण झाली पाहिजेत,असे आदेश देताना ‘ठेकेदार तुम्हाला चुकीची माहिती देऊन चुना लावतात आणि तुम्ही मला ती चुकीची माहिती देऊन चुना लावू नका,’ अशा कडक शब्दांत नितीन गडकरी यांनी ‘एनएचएआय’च्या अधिकाऱ्यांना सुनावले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe