रेल्वेलाईनचे दुहेरीकरण; व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण

Published on -

श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर ते शिरसगाव हद्दीतील रेल्वेलाईन दोन्ही बाजूने शहरातून जाणाऱ्या मार्गावरील १५ हजार व्यावसायिक, रहिवाश्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. पूर्वीच्या जागी असलेला रेल्वे मालधक्का हा स्थलांतरीत करून कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर नेला आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांनी रेल्वे लाईनचे दुहेरीकरणाचे तसेच रेल्वे हद्दीचे दोन्ही बाजूने मोजमाप सुरू केल्याने शहरामध्ये संताप व्यक्त होत असल्याची माहिती कामगार नेते नागेश सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

अनेक रहिवाशांनी दोन्ही बाजूने लाखो रूपये देवून घर, व्यापारी गाळे ५० वर्षापूर्वी विकत घेतले. शहराच्या विकासाला हातभार लावला. शासनाने शहरात निर्वासीतांचा गुरूनानक मार्केट मध्ये व्यवसायाकरीता नाममात्र भाडेतत्वावर गाळे देवून त्यांनाही मुख्य प्रवाहात आणले.

शहरात सर्व काही सुरळीत चालले असताना रेल्वे लाईन सेंट्रल पासून उत्तरेकडील १२५ फूट तर दक्षिणेकडील ९१ फूट जागा रेल्वे प्रशासन ताब्यात घेणार, असे समजले आहे. यामुळे अनेक जणांचे घरे दुकाने, गाळे जावून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार असून ते बेघर होतील, अशी धास्ती निर्माण झाली आहे.

रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतल्यास त्यांना मोठ्या प्रमाणात उद्रेकाला सामोरे जावे लागेल. शहरातील १५ हजार रहिवाशी, व्यावसायिक, व्यापाऱ्यांच्या मतावर निवडून येणाऱ्या माजी नगराध्यक्ष,

आजी-माजी आमदार, खासदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकारी यांनी रेल्वे प्रशासन, रहिवासी, व्यापारी यांची संयुक्त बैठक घेवुन निर्माण झालेले भितीचे सावट दूर करून त्यांनी त्यांची या विषयाची भूमिका स्पष्ट करावी.

विस्थापित होऊ पाहणाऱ्या सर्व रहिवाशी, छोटे व्यावसायिक, व्यापारी यांची पुढील दिशा ठरविण्यासाठी सर्वपक्षीय बैठक घेणार आहे, असे कामगारनेते नागेश सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!