अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2022 Maharashtra news :- करोनाचे सावट दूर होऊन सर्व व्यवहार खुले होत असताना महागाईचा विळखा मात्र घट्ट होत आहे. इंधन, गॅस, खाद्य तेल यासह अन्य जीवनावश्यक वस्तू महाग होत असताना आता घरेही महामगणार आहेत.
त्यामुळे घर घेण्याच्या सर्वसामान्यांच्या स्वप्नांना घरघर लागली आहे. एक एप्रिलपासून राज्य सरकारकडून बाजार मूल्यामध्ये (रेडीरेकनर) दरात बदल केले जातात.p

करोनामुळे काही काळ हे दर स्थीर ठेवण्यात आले होते. यावेळी मात्र त्यामध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने यंदा रेडीरेकनरच्या दरात सरासरी पाच टक्के वाढ केली.
राज्यात महापालिका क्षेत्रात सरासरी ८.८० टक्के, ग्रामीण भागात सरासरी ६.९६ टक्के आणि शहरालगतच्या नव्याने विकासित होणाऱ्या परिसरात ३.९० टक्के दरवाढ करण्यात आली आहे.
त्यामुळे घरांच्या किमती वाढणार आहेत. महापालिका क्षेत्रांमध्ये सर्वाधिक १३.१२ टक्के दरवाढ मालेगाव महापालिकेत झाली आहे. दुसऱ्या स्थानावर औरंगाबाद महापालिका आहे.
या महापालिकेत १२.३८ टक्के वाढ झाली असून, पिंपरी-चिंचवड महापालिकेत १२.३६ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर नाशिक महापालिका असून, या महापालिकेत १२.१५ टक्के दरवाढ झाली आहे. पाचव्या स्थानावर लातूर महापालिका असून, ११.९३ टक्के वाढ करण्यात आली आहे.