Ahmednagar Rain : शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बोधेगाव, हातगाव, बालमटाकळी, मुंगी, कांबी, लाडजळगावसह चापडगाव परिसरात पाऊस नसल्याने व गेली २ ते ३ दिवसांपासून फक्त कोरडी हवा सुरू असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
चालू हंगामात पावसाळ्याचा जून व जुलै महिना उलटून गेला असून, ऑगस्ट महिन्यातील पहिला आठवडा संपत आला तरी परिसरात अजूनही मोठा पाऊस न झाल्याने व अशीच परिस्थिती काही दिवस राहिली तर अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही भेडसावणार आहे.

चालू हंगामात खरिपाचा पेरणी व लागवडीचा मोसम वाया जाऊ नये म्हणून अनेक शेतकऱ्यांनी धाडस करून मोला महागाची बी-बियाणे व खते खरेदी करून त्याची पेरणी व लागवड केली. त्यानंतर काही प्रमाणात पावसाने थोडीफार हजेरी लावली, थोड्या फार पावसाच्या हजेरीमुळे खरीप पिके उगवून आली.
कपाशी हे शेतकऱ्यांचे पांढर सोनं समजलं जात असून, नगदी पीक असल्याने मोठ्या प्रमाणात कपाशी पिकाचा शेवगावसह तालुक्याच्या पूर्व भागात पेरा झालेला आहे. शेतकऱ्यांचा कपाशी पिकाकडे प्रत्येक वर्षी कल वाढत असल्याने पेरणीचे क्षेत्रही प्रत्येक वर्षी वाढताना दिसून येत आहे.
त्यातच शेवगाव तालुक्यात दर्जेदार कपाशीचे पीक येत असल्याने अनेक ठिकाणांहून मोठ मोठे व्यापारी येऊन शेवगाव तालुक्यातील कपाशीची खरेदी करताना दिसून येत असतात. मात्र, पावसाळ्याच्या चालू हंगामात पेरणी होऊन पीक उगवून आल्याने शेतकऱ्यांनी अंतर्गत मशागतीची कामेही पूर्ण केली असल्याचे दिसून येत आहे.
मात्र, सध्या पावसाची अपेक्षा असताना पाऊस पडत नसल्याने कपाशीसह खरिपाची पिकेही सुकू लागली असल्याचे दिसून येत आहे. येत्या थोड्याच दिवसांत पावसाने हजेरी लावली नाही तर खरीप पिकांचेही प्रचंड नुकसान होऊन पिण्याचा पाण्याचाही प्रश्न उग्र स्वरूप धारण करेल, अशी चर्चा जाणकार शेतकरी व नागरिकांतून होत आहे.