मुंबईतील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास मुंबई महानगरपालिकेने परवानगी नाकारली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट या दोघांनाही परवानगी देण्यास महापालिकेने नकार दिला आहे.
शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी होणार असतानाच महापालिकेने दिला निर्णय आहे. शिंदे गटाला पर्यायी जागा आहे, मात्र ठाकरे गटाला कोर्टातून दिलासा मिळाला नाही तर मोठी अडचण होणार आहे.
अनेक दिवस प्रलंबित असलेला आपला निर्णय महापालिकेने दिला आहे. यासाठी त्यांनी पोलिसांच्या अहवालाचा आधार घेतला आहे. या ठिकाणी कोणत्याही गटाला मेळावा घेण्यास परवानगी दिली तरीही तेथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा अहवाल पोलिसांनी दिला आहे.
त्या आधारे दोन्ही गटांना परवानगी नाकारत असल्याचे महापालिका आयुक्तांनी म्हटले आहे. आता शिवसेनेतर्फे हायकोर्टात दाखल याचिकेवर आज काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे.