दिल्ली : शिवसेनेचे (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारले आहे. यावेळी त्यांच्यासोबत काही आमदारदेखील आहेत. जवळपास एकनाथ शिंदे यांनी २९ आमदारांना घेऊन बंड पुकारल्यामुळे खळबळ उडाली आहे.
याबाबत नवी दिल्लीत (Delhi) शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेऊन भाष्य केलं आहे. महाराष्ट्रात (Maharashatra) जे झालं ते जगाच्या समोर आहे, असं म्हणतानाच ही पूर्ण फसवणूक आहे, असा टोलाही पवारांनी लगावला आहे.

तसेच विधान परिषदेत झालेल्या मतदानामुळे आमच्यात कोणी नाराज नाही, असं पवारांनी स्पष्ट केलं आहे. आमच्या मित्रपक्षाचा एक उमेदवार निवडून येऊ शकला नाही. आम्ही परत गेल्यावर आमच्या सहकाऱ्यांशी बोलू. इथली स्थिती पाहून काही ना काही मार्ग निघेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्रीपदावर बोलताना शरद पवारांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. कोण बोललं असेल मला मुख्यमंत्री बनवा, पण शिवसेनेकडेच मुंख्यमत्रीपदाची जबाबदारी आहे. उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी राष्ट्रवादीची आहे, विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे. मुख्यमंत्री बदलायचा असेल तर त्यांचा निर्णय आहे.
मात्र उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) नेतृत्व बदलण्याची आम्हाला गरज वाटत नाही, असंही शरद पवारांनी म्हटले आहे. तसंच उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं नाही. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षाची बैठक बोलावली आहे. दुपारी ते त्यांच्या नेत्यांशी चर्चा करतील.
त्यानंतर त्यांच्याशी आम्ही बोलू. हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे, असंही ते म्हणाले. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना आम्ही तिघे सोबत आहे. पण एक्झॅटली काय मुद्दा आहे. तो प्रॉब्लेम कसा सोडवायचा हे शिवसेनेकडून कळवलं जात नाही. त्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही, असंही ते म्हणाले आहेत.