Farmer succes story: शेती (Farming) हा बारामाही चालणारा व्यवसाय आणि शेतकरी बांधवांचे (Farmers) बारामाही नोकरींचे ठिकाण. आता शेती व्यवसायात नवयुवक देखील आपली हजेरी नोंदवत आहेत. काळाच्या ओघात नवयुवक आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत शेती व्यवसायात नेत्रदीपक यश मिळवित आहेत.
सुशिक्षित नवयुवक शेतकरी शेती व्यवसायात आल्याने शेती व्यवसायाचा चेहरा आता बदलू लागला आहे. सुशिक्षित नवयुवक आपल्या ज्ञानाचा शेती व्यवसायात वापर करून चांगली लाखो रुपयांची कमाई देखील करीत आहेत.
पुण्यातील एका इंजिनियर बहिण-भावाच्या जोडीने देखील शेती व्यवसायात असाच नावीन्यपूर्ण बदल घडवून आणीत लाखों रुपयांची कमाई करण्याची किमया साधली आहे. मावळ तालुक्याच्या अश्विन आणि केतकी अरुण काशीद या इंजिनियर बहीण-भावाच्या जोडीने सोनचाफ्याची शेती (Sonchafa Farming) करत लाखो रुपये उत्पन्न (Farmers Income) अर्जित केले आहे.
या दोघा बहिण भावांना अगदी लहानपणापासूनच शेतीची आवड. यामुळे उच्चशिक्षित असून देखील त्यांनी शेतीची कास धरली. सध्या केवळ अर्धा एकर सोनचाफ्याच्या लागवडीतून अडीच लाखांचा निव्वळ नफा या बहिण भावाच्या जोडीला मिळत आहे.
अश्विन हा सिव्हिल इंजिनियर असला तरी त्याला शेती मनापासून आवडते. बहिण केतकी खरं पाहता आयटी इंजिनियर मात्र तिला देखील शेती जीवापाड प्रिय आहे. अश्विन व केतकी यांचे वडील पूर्वी पारंपारिक शेती करायचे यामध्ये धान, उस या पिकांचा समावेश असायचा.
मात्र पारंपरिक पीक पद्धतीत अपेक्षित असे उत्पन्न त्यांना मिळत नव्हते. यामुळे आपण शेतीमध्ये जरा हटके प्रयोग करायचा असा निर्णय अश्विनने घेतला. अन मग काय, इंजिनीयर माणूस, शोधाशोध सुरू केली माहितीची जमवाजमव झाली अन सोनचाफा लागवडीचा भन्नाट प्रयोग करण्याचे ठरवलं, अन बघता बघता सोनचाफा लागवड करून टाकली.
सोनचाफ्याची रोपे मागवली. रोपे 3 वर्ष जुनी मागवली. रोप लावण्यासाठी अश्विन यांना त्यांच्या परिवाराचे अनमोल सहकार्य लाभले. अश्विनने सोनचाफा लागवड केल्यानंतर अहोरात्र काबाडकष्ट केले या कामात त्याची बहीण केतकी देखील त्याला मदत करीत असे.
मात्र, नियतीला काही औरच मान्य होतं. अहोरात्र काबाडकष्ट करून उत्पादित केलेला सोनचाफा कोरोना नामक महाभयंकर आजाराने लावल्या गेलेल्या लॉकडाऊन मध्ये शेतातच सोडला. यामध्ये अश्विनचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
मात्र स्वभावाने जिद्दी अश्विन व त्याची पाठराखण करणारी त्याची खंबीर बहीण केतकी यांनी न खचता पुन्हा एकदा जिद्दीने सोनचाफा लागवडीवर लक्ष केंद्रित केले. सध्या, त्याच्या जिद्दीला यश आले असून सोनचाफा शेतीतून तो दिवसाकाठी हजारो रुपयांची कमाई करत आहे.
रोज सकाळी अश्विन त्याची बहीण केतकी आणि त्यांचे आई-वडील सोनचाफा फुलं तोडून जवळच्या बाजारपेठेत विक्री करतात. दहा फुलांच पाकीट बनवून 10 ते 20 रुपये दराने सोनचाफा विक्री होत आहे. निश्चितच अश्विन व त्यांची बहीण केतकी यांनी मिळवलेले हे नेत्रदीपक यश इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा देणारे सिद्ध होणार आहे. या बहिण भावाच्या जोडीने कमी शेतीत देखील लाखो रुपयांची कमाई केली जाऊ शकते हे सिद्ध करून दिले आहे.