अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यातील झालेल्या अतिवृष्टीमध्ये अनेक नागरिकांच्या घरांचे व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. संबंधित नुकसानीचे प्रशासनाने त्वरित पंचनामे करून अहवाल शासनास सादर करावा, व तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या आजी-माजी आमदारांनी जिल्हा प्रशासनाकडे सोमवारी केली.
याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना दिले. जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या आठवड्यात जिल्ह्यात पाथर्डी, शेवगाव, नगर तालुक्यासह इतर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली.
त्यामुळे शेतकरी, व्यावसायिक, पशुपालक यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. गायी, म्हशी, शेळ्या, कोंबड्या पाळणारे पशुपालक यांच्या पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांना गायी-म्हशीसाठी प्रत्येकी एक लाख रुपये व शेळ्या, कोंबड्यांसाठी दहा हजार रुपये आर्थिक मदत मिळावी.
ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे किंवा पडझड झालेली आहे, घरातील भांडीकुंडी वाहून गेलेली आहेत, अशा नुकसानग्रस्तांना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत मिळावी. अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी बुजल्या व शेततळे फुटले, वाहून गेले अशा शेतकऱ्यांना एक लाखाची भरपाई मिळावी.
पुराचे पाणी तसेच बंधाारे फुटल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना सरसकट ६० हजार एकरी मदत मिळावी. आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वर्ग व्हावी. छोटे व्यावसायिक, उद्योग-धंदे करणारे यांच्या दुकानात पाणी शिरल्यामुळे त्यांचा कच्चा माल तसेच किराणा माल निकामी झालेला आहे.
त्यामुळे त्यांना तातडीने एक लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी. या वेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री प्रा. राम शिंदे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार मोनिका राजळे,
माजी आमदार शिवाजी कर्डिले, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, वसंत चेडे, अशोक खेडकर, दिलीप भालसिंग, माणिक खेडकर, अंबादास पिसाळ, अनिल लांडगे, वसंत सोनवणे, जिजाऊ लोंढे, बाळासाहेब अकोलकर, मनोज कोकाटे उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम