अहमदनगर Live24 टीम, 07 ऑक्टोबर 2021 राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी प्राप्तिकर विभागाकडून कारवाई केली जात असल्याची माहिती समोर येत आहे.
साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. फक्त जरंडेश्वरच नाही तर दौंड शुगर, आंबलिक शुगर, पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर कारवाई सुरू असल्याचं कळत आहे. हे सर्व साखर कारखाने अजित पवारांच्या निकटवर्तीयांचे असल्याचं कळत आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील अंबालिका कारखाना अजित पवारांच्या खासगी मालकीचा आहे. त्याचबरोबर बारामतीतील डायनॅमिक्स डेअरीवर देखील छापा सुरू आहे. शरद पवारांशी संबंधित गोयंका कुटुंबीयाची आहे. या सर्व पवारांशी संबंधित संस्था असल्याची माहिती आहे.
प्राथमिक माहितीनुसार, केंद्रीय यंत्रणांनी सकाळी सात वाजल्यापासून ही छापेमारी सुरू केली आहे. ज्या साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागाची छापेमारी होत आहे ते सर्वजण हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय आहेत.
त्यामुळे इन्कम टॅक्स विभागाकडून सुरू असलेल्या या कारवाईमुळे थेट अजित पवार यांना धक्का असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान अजित पवार यांची बहीण विजया पाटील यांच्या मुक्ता पब्लिकेशन हाऊसवर देखील प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. आयकरच्या चार अधिकाऱ्यांकडून मुक्ता पब्लिकेशनमध्ये कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे.
विजया पाटील यांच्या कोल्हापुरातील घरावर देखील आयकरचे अधिकारी पोहचले आहेत. तर विजया पाटील या पुईखडी इथल्या घरात उपस्थित आहेत. तसंच या कारवाईवर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली असून नाराजी आणि संताप जाहीर केली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
माझ्याशी संबंध आहे म्हणून यंत्रणांच्या धाडी टाकणं हे खालच्या पातळीचं राजकारण असल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले आहेत. फक्त माझे नातेवाईक असल्याने धाडसत्र सुरु आहे याचं वाईट वाटत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. “छापेमारी कोणावर करावी हा प्राप्तिकर विभागाचा अधिकार आहे.
जर काही शंका आली तर ते छापेमारी करु शकतात. त्याप्रकारे माझ्याशी संबंधित काही कंपन्यांवर छापेमारी झाली आहे. आम्ही दरवर्षी कर भरणारे आहोत. मी राज्याचा अर्थमंत्री असल्याने आर्थिक शिस्त कशी लावायची असते,
कोणताही कर कसा चुकवायचा नाही हे मला चांगलं माहिती आहे. त्यामुळे माझ्याशी संबंधित कंपन्यांचे कर वेळीच भरले जातात,” असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम