अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- राहुरी येथील येवले आखाड्यावरील नवविवाहित तरूणीचा छळ करून तिला घरातून हाकलून लावण्यासाठी तिच्यावर काळा जादूटोणा करण्यात आला.
या घटनेबाबत श्रीरामपूर तालुक्यातील एका डॉक्टर पती व मांत्रिकासह एकूण सहाजणांवर राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, अश्विनी विकास लवांडे या तरूणीचा विवाह 12 फेब्रुवारी 2020 रोजी डॉ. विकास विश्वनाथ लवांडे (रा. कारेगाव ता. श्रीरामपूर) याच्याबरोबर झाला होता. अश्विनी ही श्रीरामपूर येथील कारेगाव येथे तिच्या सासरी नांदत असताना तिची सासू ब्रेनट्याकने मयत झाली होती.
त्यानंतर सासरच्या लोकांनी अश्विनीला तू अपशकूनी व पांढर्या पायाची आहे. तुझ्यामुळेच तुझी सासू मयत झाली. असे आरोप करून तिचा छळ करण्यास सुरुवात केली. दरम्यान, तिच्या सासरच्या लोकांनी एका मांत्रिक बाबाला बोलावून अश्विनीवर काळा जादूटोण्यासारखा प्रकार सुरू केला.
माहेरच्या लोकांना काही टेन्शन नको म्हणून तिने कोणाला काही सांगितले नाही. मात्र एके दिवशी अश्विनीच्या वडिलांनी अश्विनीकडे काळी बाहूली, लिंबू व तावीत अशा वस्तू पाहिल्यावर हा काय प्रकार आहे? असे विचारले असता सर्व प्रकार त्यांना समजला.
त्यांनी तात्काळ महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती अहमदनगरचे पदाधिकारी महेश धनवटे रा. राहुरी यांना हा प्रकार सांगितला व त्यांच्यासह राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. अश्विनीच्या फिर्यादीवरून पोलिसांत पती डॉ. विकास विश्वनाथ लवांडे, सासरा विश्वनाथ रखमाजी लवांडे,
नणंद पुनम विश्वनाथ लवांडे तिघे रा. कारेगाव तसेच मामा सासरा किशोर सीताराम दौड, मामी सासू प्रमिला किशोर दौड दोघे रा. मातापूर ता. श्रीरामपूर आणि जादूटोणा करणारा एक मांत्रीक अशा सहाजणांवर जादुटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम