राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी…महागाई भत्त्यात 5 टक्क्यांची वाढ

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑक्टोबर 2021 :-  दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात आलाय.

दिवाळीच्या पार्श्वभूमिवर एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ करण्यात आली असून दिवाळीची भेट म्हणून अधिकाऱ्यांना 5 हजार रूपये तर कर्मचाऱ्यांना 2500 रूपये देण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री ॲड. परब यांनी सोमवारी केली.

परिवहन मंत्री परब म्हणाले, या निर्णयाचा लाभ एसटी महामंडळाच्या सुमारे 93 हजारांहून अधिक कर्मचारी-अधिकाऱ्यांना होणार आहे.

विशेष म्हणजे प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेला होणारा पगार यंदा नोव्हेंबरच्या 1 तारखेला म्हणजे दिवाळीपूर्वी होणार आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होण्यासाठी सकारात्मक सहकार्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचे अनिल परब यांनी आभार मानले.

महागाई भत्त्यात वाढ करावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सध्या कर्मचाऱ्यांना 12 टक्के महागाई भत्ता मिळत आहे, त्यात आणखी 5 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता 17 टक्के होणार असल्याचे परब यांनी यावेळी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe