Farmer Success Story:- आजकालचे तरुण जसे प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवर आहेत तसेच शेती क्षेत्रामध्ये देखील आता तरुणांनी मोठ्या प्रमाणावर क्रांती केली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. म्हणजेच शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि वेगवेगळ्या पिकांची सांगड घालत तरुणांनी खूप मोठ्या प्रमाणावर शेतीमध्ये प्रगती केल्याचे सध्या चित्र दिसून येत आहे व हे चित्र नक्कीच दिलासादायक आहे.
दुसरे म्हणजे शेतीतील विविध कामांकरिता तंत्रज्ञानाचा वापर करतातच परंतु यंत्रांचा वापर देखील तरुण शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सुरू केला आहे. याही पुढे जात काही तरुण शेतकऱ्यांनी तर शेतीच्या विविध कामांकरिता उपयोगी पडतील असे स्वस्तात मस्त यंत्रांची निर्मिती देखील केलेली आहे.
अशाच एका तरुण शेतकऱ्याची यशोगाथा जर आपण बघितली तर तरुणाने पाच लाखांचे कर्ज घेऊन स्वतःची कंपनी स्थापन केली व कीटकनाशक फवारणीसाठी आधुनिक असे फवारणी यंत्र बनवायला सुरुवात केली. नेमके या तरुणाने हे कसे शक्य केले? याबाबतची माहिती या लेखात आपण घेऊ.
पाच लाखांचे कर्ज घेऊन उभारली कंपनी
याबाबत सविस्तर वृत्त असे की, छत्रपती संभाजी नगर येथील तरुण शेतकरी योगेश गावंडे यांनी कीटकनाशक फवारणीसाठी चाकांवर आधारित फवारणी यंत्र बनवले असून यंत्राच्या निर्मितीसाठी पाच लाख रुपयांचे कर्ज घेऊन कंपनी स्थापन केली व या कंपनीचे उलाढाल आज तीन कोटी रुपयांच्या आसपास आहे.
एवढेच नाही तर या कंपनीत आज 100 लोकांना रोजगार देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या कंपनी स्थापन करण्यामागील प्रेरणा पाहिली तर योगेशचा लहान भावाला कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे सुरक्षित असे फवारणी यंत्र विकसित करावे असे योगेशला वाटले व त्याने चाकावर चालणारे कीटकनाशक फवारणी यंत्र विकसित केले. हे मशीन बनवण्याकरिता त्याच्या मोठ्या भावाने साडेपाच लाख रुपयांचे कर्ज घेतले होते
व सहा वर्ष कष्ट घेतल्यानंतर तीन कोटी रुपयांची उलाढाल असलेली त्यांची नियो फार्मटेक नावाची कंपनी स्थापन केली. योगेश हा शेतकरी कुटुंबातील असून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना त्याच्या 2015 मध्ये त्याच्या लहान भावाला शेतात फवारणी करताना विषबाधा झाली व त्यानंतर त्यांनी सुरक्षित असे फवारणी यंत्र बनवण्याचे ठरवले व ते सहजपणे चालवता येईल अशा पद्धतीचे यंत्र तयार करण्याचे स्वप्न पाहिले.
याकरिता त्यांनी 2017 मध्ये भारतीय युवा शक्ती ट्रस्टच्या संपर्कात येऊन मशीन बनवण्याचे ध्येय साध्य करण्याचा मार्ग शोधला. या भारतीय युवाशक्ती ट्रस्टच्या मदतीने साडेपाच लाखांचे कर्ज त्यांनी मिळवले व या मदतीने मशीन बनवून त्याची विक्री सुरू केली.
कसे आहे हे फवारणी यंत्र?
योगेश यांनी बनवलेला स्प्रे पंप हा बॅटरीवर चालतो. हा स्प्रे पंप चाकांवर आधारित असल्यामुळे अपंग शेतकरी किंवा पाय, हात नसलेल्यांना देखील या स्प्रे पंपामुळे खूप मोठा दिलासा मिळाला आहे. हा स्प्रे पंप खूप काळजीपूर्वक तयार करण्यात आलेला असून पारंपारिक फवारणी यंत्राच्या तुलनेत योगेश ने बनवलेल्या स्प्रे पंपला शरीरावर वाहून नेण्याची आवश्यकता नसते.
महत्वाचे म्हणजे एकाच वेळी चार फवारणी पाईप यामध्ये चालतात त्यामुळे पिकाचे एक मोठे क्षेत्र एकावेळी फवारणी करता येणे शक्य होते. हाताने किंवा बॅटरीने देखील चालवता येतो. 2019 पासून ते आतापर्यंत योगेशने 5000 फवारणी पंपांची विक्री केली. भारतातील अनेक राज्यांमध्ये शेतकऱ्यांना स्प्रे पंप पुरवणाऱ्या योगेश यांनी केनियातील सिनी काकू ऍग्रो सोबत करार केला आहे. सॅम्पल स्प्रे पंप यामध्ये पाठवले आहेत.
मॅन्युअल नियो स्प्रे पंपची किंमत दहा हजार रुपये आहे. तर यामधील टॉप मॉडेलची किंमत तीस हजार रुपये इतकी आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये यासंबंधीचे एक ऍडव्हान्स मॉडेल आणणार असून त्याची किंमत एक लाख 80 हजार रुपये इतकी असणार आहे.
जर योगेशच्या कंपनीची उलाढाल पाहिली तर ती 2023-24 या आर्थिक वर्षात दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल केली असून मार्चपर्यंत तीन कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल. अशा पद्धतीने एका छोट्याशा घटनेतून प्रेरणा घेत साडेपाच लाख रुपये कर्ज घेऊन योगेश यांनी कंपनी स्थापन केली व आज कष्टाने ते तीन कोटी रुपयांपर्यंत पोहोचवली आहे.