अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या बाधित पिकांच्या शेतकऱ्यांना शासनाने प्रति हेक्टरी १० हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले.
पंचनाम्यानुसार नुकसानीच्या अनुदानाच्या एकूण उद्दिष्टापैकी जवळपास ७५ टक्क्यांपेक्षा अधिक रक्कम श्रीरामपूर तालुक्याला प्राप्त झाली.
परंतु येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप अनुदान मिळाले नाही. केवळ कारेगावचे शेतकरीच अनुदानापासून वंचित ठेवले असल्याची तक्रार शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तथा राज्य ऊस नियंत्रण मंडळाचे सदस्य बाळासाहेब पटारे यांचेसह शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून तत्काळ अनुदान वर्ग न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला.
बाळासाहेब पटारे, अशोक कारखान्याचे माजी संचालक साहेबराव पटारे, कानिफनाथ चव्हाण, संजय इंगळे, राहुल नागुडे, बहिरीनाथ गोरे आदी शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, झालेल्या पंचनाम्यानुसार कारेगाव येथील बाधित पिकांचे क्षेत्र ३१३.०३ हेक्टर असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ४५३ आहे.
त्यानुसार कारेगावची अनुदानाची रक्कम ३१ लाख ५१ हजार ८०० रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येते. यापैकी एकाही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अद्यापपर्यंत अनुदान वर्ग झाले नसल्याचे यावेळी प्रांताधिकारी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
फक्त कारेगाव येथील शेतकरीच अनुदानापासून का वंचित राहिले आहेत याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अनुदानाची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करावी, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा दिला. कारेगाव येथील अतिवृष्टीने बाधीत पिकांचे पंचनामे करताना खासगी मदतनीस व्यक्तीने अनेक शेतकऱ्यांकडून पैसे उकळले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम