नगर जिल्ह्यातील ‘ या’ साखर कारखान्याची नियमबाह्य ऑनलाईन सभा रद्द करण्याची शेतकरी संघटनेची मागणी

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने २९ सप्टेंबर रोजी आयोजित केलेली ऑनलाईन सर्वसाधारण सभा पूर्णपणे नियमबाह्य असून ती रद्द करावी तसेच गाळप हंगाम २०२०-२१ चे दुसरे पेमेंट ८०० रूपये प्रतिटणाप्रमाणे करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल औताडे यांनी केली आहे.

याबाबत शेतकरी संघटनेच्यावतीने अशोक कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आयोजित केलेली ही सर्वसाधारण ऑनलाईन सभा ही सभासद व शासनाची दिशाभूल करणारी आहे. उच्च न्यायालायाने सर्व संचालक मंडळाचे अधिकार गोठविलेले असून अशा प्रकारची नोटीस काढण्याचा कुठलाही अधिकार नाही. मंडळाची ही कृती म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान आहे.

शिवाय या सभेबाबत काढण्यात आलेल्या नोटीशीमध्ये विषय क्रमांक ५ अन्वये विधानिक लेखा परिक्षक यांनी दिलेला सन २०२०-२१ या आर्थिक वर्षांच्या लेखा परिक्षण अहवलावर कारखान्याने तयार केलेला वैधानिक लेखापरिक्षक यांना सदर केलेला दोष दुरूस्ती अहवाल वाचून त्याची नोंद घेणे व त्यास मान्यता देणे.

तसेच विषय क्रमांक १२ नुसार महसुली उत्पन्न विभागणीच्या आधारे निघणारा ऊसदर व कारखान्याने प्रत्यक्ष अदा केलेला ऊस दर विचारात घेऊन गाळप हंगाम २०२०-२१ करिता अंतीम ऊस दरास मान्यता देणे हे मुद्दे चर्चेसाठी घेण्यात आले आहेत.

मात्र याबाबत कारखाना प्रशासनाने गाळप हंगाम २०२०-२१ चा अहवाल, वैधानिक लेखा परिक्षण अहवाल, महसुली उत्पन्न माहिती उपलब्ध करून न देता अनभिज्ञ ठेवून फसवणूक व दिशाभूल केली आहे. तसेच दोन वर्षे उलटूनही गाळप अंगाम २०१९-२० च्या महसुली उत्पन्नाबाबत हिशेब दिलेला नाही.

त्यामुळे बोलावण्यात आलेली ही सर्वसाधारण सभा पूर्णपणे बेकायदेशीर असून ती रद्द करावी तसेच गाळप हंगाम २०२०-२१ चे दुसरे पेमेंट ८०० रूपये प्रतिटणाप्रमाणे करावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष अनिल औताडे व युवराज जगताप यांच्या सह्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe