ऐन पावसाळ्यात पाऊस गायब राहिला. त्यामुळे अनेक ठिकाणी दुष्काळी स्थिती आहे. परंतु आता शेतकऱ्यांना महत्वाची बातमी आहे. पाच दिवस पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवल्याने रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
कन्याकुमारी ते आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्याच्या किनारपट्टी समोर बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. ही प्रणाली महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर उत्तरेकडे आगेकूच करणार असल्याने पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कुठे कधी पडणार पाऊस
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात आजपासून २३ ते २७ नोव्हेंबर दरम्यान ढगाळ वातावरण राहील. यात कोकण, गोवा, उत्तर व मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पाऊस पडेल.
२३ जिल्ह्यांत पावसाचा अंदाज असून नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, बुलडाणा, अकोला या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे.
२५ नोव्हेंबरला वायव्य व उत्तर भारतात आदळणाऱ्या पश्चिमी झंझावाताचा परिणाम थेट मध्य प्रदेश, गुजरात व उत्तर महाराष्ट्रापर्यंत होणार असल्याने पाच दिवस पावसाळी वातावरण राहणार आहे.
अहमदनगर जिल्ह्याला यलो अलर्ट
अहमदनगर शहरासह जिल्ह्यात २४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान यलो अलर्ट देण्यात आला आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होते. त्यामुळे थंडीही कमी झाली आहे.
दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. सध्या शेतकऱ्यांनी रब्बीची तयारी केली आहे.
पाण्याची चिंता तर आहेच. त्यामुळे २४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान मध्यम स्वरूपाचा पाऊस जर झाला तर रब्बीच्या आशा पल्लवीत होतील.