अहमदनगर Live24 टीम, 31 ऑक्टोबर 2021 :- मागील दोन महिन्यात बीड जिल्ह्यात 11 वेळा अतिवृष्टी झाली, यामुळे झालेल्या नुकसानीच्या मदतीपोटी राज्य सरकारने एसडीआरएफच्या निकषांपेक्षा अधिक मदत जाहीर करत त्याचा पहिला टप्पा म्हणून 2860 कोटी रुपये दिले.
त्यात सर्वाधिक 502.37 कोटी रुपये बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत म्हणून दिले, ही मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावी यासाठी प्रशासकीय यंत्रणा गतिमान करण्यात आली असून शनिवारी,
रविवारी सुद्धा काम सुरू राहणार असल्याचे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार परिषदेत सांगितले.
मराठवाड्यात सर्वाधिक मदत बीड जिल्ह्यात दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,
तसेच मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे जिल्हा वासीयांच्या वतीने आभार व्यक्त करतो, असेही पुढे बोलताना मुंडे म्हणाले. खरीप 2020 व खरीप 2021 चा पीकविमा मिळणार खरीप 2020 मधील सुमारे साडेतीन लाख शेतकऱ्यांचा पीकविमा प्रलंबित आहे,
यामध्ये कंपनीने घातलेल्या ऑनलाईन-ऑफलाईनच्या घोळाचा प्रश्न राज्य सरकारने मध्यस्ती करून सोडवला आहे. तो विमा लवकरच मंजूर होऊन शेतकऱ्यांना मिळेल.
तसेच चालू वर्षी झालेल्या अतोनात नुकसानीचा विमा तातडीने शेतकऱ्यांना मिळावा यासाठी राज्य सरकारने विमा कंपन्याना आपल्या हिस्स्याची 973 कोटी रुपये रक्कम दिली आहे.
मात्र केंद्र सरकारने अद्याप त्यांच्या हिस्स्याची रक्कम विमा कंपन्याना दिलेली नाही, ती रक्कम येत्या काही दिवसातच जमा होण्याची अपेक्षा आहे.
ती रक्कम जमा होताच विमा कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांचा हक्काचा पीकविमा मिळण्यास सुरुवात होईल असा विश्वास धनंजय मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम