वडील आणि मुलगा कोरोनाने गेले..पाच लाखाच्या कर्जाचा डोंगर कसा फिटणार ? अहमदनगर जिल्ह्यातील भीषण वास्तव !

Ahmednagarlive24
Published:

हेरंब कुलकर्णी :- कोरोनात मृत्यू झालेल्या कुटुंबांना भेट देताना अकोले तालुक्यातील टाहाकरी या गावी दत्तू एखंडे च्या घरी पोहोचलो. वडील आणि मुलगा फक्त तीन दिवसाच्या अंतराने मृत्यू झालेले हे कुटुंब… 

जमीन अत्यल्प आहे आणि दोघांच्या दवाखान्याचे बिल पाच लाख रुपये भरूनही दोघेही वाचले नाहीत..वडील रतन २ मे ला आणि दत्तू हा तरुण मुलगा ५ मे ला कोरोना ने वारले. एका छोट्या खोलीत रतन एखंडे यांची पत्नी विड्या वळत बसली होती..

५७ वर्षांची ती महिला सकाळी सातपासून संध्याकाळपर्यंत विड्या वळते. गुडघे आणि पाठ खूप दुखते परंतु लोकांचे कर्ज फेडायचे आहे त्यामुळे दुसरे काय करणार…? 

दिवसाला शंभर रुपये फक्त यातून मिळतात.. घर चालवायचे आहे आणि कर्जही फेडायचे आहे.. नवरा आणि मुलाच्या फोटो कडे बघून त्यांचे सारखे डोळे भरून येत होते..

त्यांची सून शेतात राहते. तेव्हा आम्ही शेतातही गेलो. अवघ्या २० गुंठे जमिनीतून जे पिकेल ते पिकवते आहे. कुडाच्या झोपडीत ती राहत होती. 

तिच्या भावाने संरक्षण म्हणून सिमेंटच्या ब्लॉकचे छोटे कर्ज फेडायचे म्हणून जनावरेही विकून टाकली. आता ती स्वतःच्या शेतात आणि आजूबाजूच्या शेतांमध्ये मजुरी करते आणि त्यावर गुजराण करते..

तिकडे गावात सासु विड्या वळते आणि शेतात सून मजुरी करते.. यातून पाच लाखाच्या कर्जाचा डोंगर कसा फिटणार आहे… हाच प्रश्न पडला. अवघ्या तीन दिवसात दोघींनीही दोन मृत्यू बघितले. 

केवळ आता आपल्या लहान मुलांना मोठे करायचे एवढ्याच एका स्वप्नासाठी दोघी डोळ्यातील अश्रू थांबवून जगत आहेत शंभर रुपये सकाळी ७ पासून रात्री सात पर्यंत विड्या वळत जगणारी वृद्ध माता आणि स्वतःची जनावरे विकून दुसऱ्याच्या शेतात मजुरी करणारी तिची सून.. या महिलांना महाराष्ट्र सरकार काय मदत करणार आहे…?

किमान त्यांची कर्जमुक्ती जरी सरकारने करण्यासाठी आर्थिक मदत दिली तरी कष्टाने ते त्यांचे संसार करू शकतील.. त्या गावातील सामाजिक कार्यकर्ते राम एखंडे,मनोज गायकवाड, नवनाथ नेहे यावेळी सोबत होते. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe