२५ जानेवारी २०२५ मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महिला, मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.हैवानांचा हैदोस सुरू असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत असून अशा संतापजनक तब्बल चार घटना उघडकीस आल्या.
मुंबईत गोरेगावनजीक एका २० वर्षीय तरुणीवर रिक्षाचालकाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली.तर तीन मित्रांनी एका अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने अत्याचार करत तिचा व्हिडीओ तयार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका वृद्ध महिलेवर २० वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार केला.एकापाठोपाठ एक उघडकीस आलेल्या या घटनांनी मुंबई हादरवून टाकली.
रिक्षाचालकाने वसई परिसरात एका २० वर्षीय तरुणीवर बलात्कार केला. ही पीडित तरुणी गोरेगाव रेल्वे स्थानकानजीक गंभीर अवस्थेत पोलिसांना आढळली. याप्रकरणी कसून तपास करून पोलिसांनी वालीव झोपडपट्टी परिसरातून आरोपी रिक्षाचालकाला अटक केली.याप्रकरणी वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.पीडित तरुणीला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वसई स्थानक परिसरात २१ जानेवारी रोजी रात्री भेटलेल्या एका अनोळखी रिक्षाचालकाने आपल्याला वसई जवळील सागरी चौपाटीवर नेले व तेथे आपल्यावर बलात्कार केल्याचे पीडित तरुणीने पोलिसांना सांगितले.पीडित तरुणीकडून प्राप्त झालेल्या त्रोटक माहितीच्या आधारे विरार-चर्चगेट दरम्यानचा रेल्वे परिसर, तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदार यांच्या आधारे आरोपी राजरतन सदाशिव वायवळ (३२) या रिक्षाचालकाला अटक करण्यात आली.आरोपीला वालीव येथील खैरपाडा झोपडपट्टीतून ताब्यात घेण्यात आले.
पीडितेवर दोन वेळा अत्याचार ?
याप्रकरणी पोलिसांनी पीडित तरुणीची चौकशी केली असता, पीडित तरुणीवर दोन वेळा अत्याचार झाल्याचे समोर आले.मात्र पीडित तरुणीने सुरुवातीला पोलिसांना खोटी माहिती दिली होती.आपण अनाथ असून दोन दिवसांपूर्वी मुंबईत आले होते.त्यानंतर रिक्षाने गोरेगावला जाताना अत्याचार झाल्याचे पीडितेने सांगितले होते. मात्र तिच्या बोलण्यात तफावत आढळली. पीडितेचे आई-वडील नालासोपारा परिसरात राहतात.
घटनेच्या दिवशी तिचा घरच्यांसोबत वाद झाला होता.या वादानंतर ती रागाने घरातून निघून गेली.पीडित तरुणीच्या गुप्तांगाला जखमा आढळल्या,तर तिच्या गुप्तांगात ब्लेड आणि बारीक खडे आढळले.यामुळे तिच्यावर अमानुष अत्याचार झाला असल्याचा संशय होता. दरम्यान, वडिलांच्या भीतीमुळे सामूहिक बलात्काराचा बनाव केल्याचे या तरुणीने पोलिसांना सांगितल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणातील गूढ अद्याप उलगडलेले नाही.
तीन मित्रांकडून अत्याचार
कांदिवली परिसरात अल्पवयीन मुलीला भेटायला बोलावून तिच्याच तीन मित्रांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला,तसेच हे कृत्य करून त्याचे चित्रीकरणही केल्याची खळबळजनक घटना समोर आली.हे प्रकरण उजेडात येताच याप्रकरणी आता ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करून तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.यात आरोपींविरोधात सामूहिक बलात्कार, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पॉक्सो) आणि माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलगी शिक्षण घेत असून ६ जानेवारीला हा प्रकार घडला. या प्रकारानंतर पीडित मुलगी घाबरल्याने याबाबत शुक्रवारी समतानगर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. यातील आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. ताब्यात घेण्यात आलेले आरोपी हे १८, २० आणि २१ वयोगटातील आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींकडील मोबाईलही जप्त केले असून ते न्यायवैधक प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.