Maharashtra News : रायगड जिल्ह्याला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारे आंबेनळी घाट आणि वरंध घाट हे दोन्ही घाट वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. त्यामुळे महाडहून पुणे आणि महाबळेश्वरकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी खुले करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
अतिवृष्टी आणि दरडी कोसळण्याच्या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे हे दोन्ही घाटरस्ते धोकादायक बनले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात अतिवृष्टीच्या काळात हे दोन्ही मार्ग बंद ठेवण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे यांनी जारी केली होती.
परंतु आता वातावरण निवळले आहे. पाऊसही कमी झाला आहे. त्यामुळे हे दोन्ही घाटरस्ते वाहतुकीसाठी खुले करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी दिली.
आंबेनळी घाट आणि वरंध घाटातील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. या दोन्ही घाटातील वाहतुकीवरील निर्बंध रायगड जिल्हा प्रशासनाने शिथिल केले आहेत. या घाटमार्गावर वारंवार दरडी कोसळण्याच्या घटना घडत असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.
आंबेनळी घाट १५ दिवसांसाठी तर वरंध घाट ३० सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी यांनी जारी केली होती. परंतु आता हे निर्बंध शिथिल करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी दिली आहे. त्यामुळे प्रवाशांना आता पोलादपूर येथून आंबेनळी घाटातून महाबळेश्वरला तसेच वरंध घाटातून पुण्याला जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
वरंध घाट हा महाड येथून पुण्याला जाण्यासाठी अतिशय जवळचा आणि सर्वांत जुना मार्ग आहे. तसेच पोलादपूर येथून आंबेनळी घाटातून महाबळेश्वर येथे लवकर पोहोचता येते. हे दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवल्याने प्रवाशांची कुचंबणा होत होती. मोठा वळसा मारून जावे लागत होते. परंतु हे निर्बंध आता हटवल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.