अखेर नेप्ती उपबाजारात कांदा लिलाव सुरु !

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :-वाराई हमाली वरून वाहतूक संघटना व व्यापारी संघटना यांच्यात झालेल्या वादावर तुर्त पडदा पडला असुन, माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या मध्यस्तीनंतर पुढील निर्णय होईपर्यत कांदा लिलाव सुरू राहणार आहेत .

कांदा वाहतुक करण्याचे आश्वासन वाहतुक संघटनेने दिल्याने कांदा लिलाव शनिवारी होणारे लिलाव सुरू राहणार आहेत . वाराई हमाली वरून नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात वाहतुक संघटना व व्यापारी संघटना यांच्यात वाद सुरू झाला .

त्याचा माल त्याचा हमाल असा निर्णय घेतल्याने काल वेळेत कांदा लिलाव होऊ शकले नाहीत .परिणामी शेतकऱ्यांना दिवसभर यासाठी ताटकळत बसावे लागले . यानंतर कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी संघटनेने घेतला .

आज या पाश्वभुमिवर नगर बाजार समितीच्या सभागृहात वाराई हमाली बाबत व्यापारी संघटना व वाहतुक संघटना , बाजार समितीचे संचालक यांच्यात संयुक्त बैठक झाली . यात माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनीही सहभाग घेतला .

यावेळी बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे ,उपसभापती संतोष म्हस्के, हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नंदकिशोर शिकरे, ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष बाबा सानप, बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांच्या प्रमुख उपस्थीतीत बैठक झाली . यात वाराई हमालीवर चर्चा झाली.

बैठकीमध्ये दि. ७ रोजी होणाऱ्या राज्य पातळीवरील बैठकीत जो काय निर्णय होईल त्याबाबत दि. ८ रोजी पुन्हा नगरमध्ये बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यांत येईल.

तोपर्यंत जुन्या प्रचलित पध्दतीने काम सुरु ठेवण्यांत यावे असा तोडगा शिवाजी कर्डिले यांच्या मध्यस्थीने काढण्यात आला. यामुळे शनिवारी होणारा कांदा लिलाव सुरू राहणार असल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली . तसेच शनिवारी शेतकऱ्यांनी कांदा घेऊन येण्याचे आवाहनही बाजार समितीने केले आहे .

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe