प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करा अन लॉकडाउन टाळा! जिल्हाधिकाऱ्यांनी केले हे आवाहन

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील बाधितांची संख्या कमी झाल्याने नागरिकात मास्क न लावणे, गर्दी करणे अशी ढिलाई आढळून येत आहे. कोरोना पूर्णतः नष्ट झालेला नाही.

व्हॅक्सीनेशन आले असले तरी गाफील राहणे उपयोगाचे नाही.राज्यातील काही भागात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. तरी, लॉकडाऊन टाळायचे असेल तर जिह्यातील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोर पालन करावे,

असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे. कोरोना परिस्थितीच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी प्रदीर्घ आढावा बैठक घेतली.

या बैठकीत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा जिल्हाधिकारी यांनी सविस्तर आढावा घेतला. जारी करण्यात आलेल्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश महसूल, पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागांना देण्यात आले.

जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, राज्यात विदर्भातील अमरावती, वर्धा तसेच पुणे,मुंबई परिसरात कोरोना बाधितांचे प्रमाण वाढल्याचे निष्पन्न होत आहे.या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती विचारात घेता साशंकता निर्माण होणे सहाजिक आहे.

याचे भान बाळगून जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्ह्यातील कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यामुळे नागरिकात मास्क वापरा विषयी गांभीर्य राहिले नसल्याचे जाणवते आहे.तसेच लग्न व इतर कार्यक्रमांना गर्दी होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

राज्यातील इतर भागात कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजनांची खबरदारी घेणे आवश्यक आहे. यासंदर्भात मंगल कार्यालय संचालकाची बैठक घेत निर्देश दिले आहेत.

तसेच निश्चित प्रमाणापेक्षा जास्त गर्दी आढळली तर तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, महानगरपालिका  आणि नगरपालिकांच्या प्रशासनास कारवाई संबंधीचे आदेश जारी केले आहेत.

मर्यादेपेक्षा लग्न समारंभात जास्त गर्दी आढळली तर कार्यालयाचा परवाना रद्द करून दंडात्मक कारवाई देखील केली जाईल. प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणीसाठी अधिकाऱ्यांकडे जबाबदारी निश्चित केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!