वंशपरंपरागत विश्वस्त यांना पदमुक्त करताना न्यायिक मार्गाचा अवलंब करा

Published on -

परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर महाराज स्थापित अहिल्यानगर येथील श्री दत्त देवस्थान ट्रस्ट, सावेडी येथील वंशपरंपरागत कायम विश्वस्त प्रतिनिधी मिलिंद गोविंद क्षीरसागर यांना विश्वस्त पदावरून काढताना विश्वस्त मंडळाने अधिकारांचा गैरवापर केला आहे. त्यामुळे त्यांची बडतर्फी केल्याचा ट्रस्टने दाखल केलेला बदल अर्ज फेटाळण्याचा निर्णय योग्य आहे असे स्पष्ट प्रतिपादन पुणे विभागाचे सह धर्मादाय आयुक्त – २ राहुल मामू यांनी आपल्या निकालपत्रात केले असून ट्रस्टने दाखल केलेले अपील फेटाळताना विश्वस्तांनी नियमांचे योग्यरीतीने पालन करावे असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज हे श्री दत्तसंप्रदायातील आद्य शंकराचार्य यांच्या परंपरेतील स्वामी होते. अहिल्यानगर येथील सावेडी मध्ये भव्य दत्तमंदिरासहित वेदांत पीठ त्यांनी स्थापन केले आहे. या ट्रस्टच्या व्यवस्थेसाठी त्यांनी सुविहित नियमावली तयार करून सहाय्यक धर्मादाय आयुक्तांची त्यास मान्यता घेतली. भक्त व सत्संग मंडळांमधून येथील विश्वस्त मंडळ नेमले नावे अशी त्यांची धारणा होती. आपल्या घराण्यातील जाज्वल्य दत्तसेवा अव्याहत सुरू रहावी यासाठी विश्वस्तमंडळामध्ये क्षीरसागर कुटुंबातील एक व्यक्ती ‘वंशपरंपरागत कायम विश्वस्त प्रतिनिधी’ नेमला जाणे अनिवार्य असेल अशी तरतूद केलेली होती. त्यानुसार गुरुदेवांनी आपली इहलोकीची यात्रा समाप्त होण्यापूर्वी त्यांच्या हयातीमध्ये सर्व धार्मिक परंपरा जाणणारा आपला पुतण्या मिलिंद गोविंद क्षीरसागर याची जुलै १९९९ मध्ये स्वतः नेमणूक केली होती. या नेमणुकीचा बदल अर्ज अहिल्यानगरच्या सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी मंजूर केला होता.

कालांतराने मिलिंद क्षीरसागर व इतर विश्वस्तांमध्ये ट्रस्टच्या कार्यप्रणाली वरून वाद होत होते. गुरुदेवांच्या परंपरेने कार्य करण्याबाबत मिलिंद आग्रही होते तर इतर विश्वस्तांचा काम करण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. त्यामुळे एक भक्त कॅप्टन एन एम चव्हाण यांनी एक अर्ज करून ट्रस्टच्या कारभाराची चौकशी करावी अशी मागणी केली होती. त्यानुसार अहिल्यानगर धर्मादाय कार्यालयातील एका निरीक्षकांनी त्यांचा अहवाल सादर केला होता. त्या अहवालाचा आधार घेवून तत्कालीन विश्वस्त मंडळाने मिलिंद क्षीरसागर यांना १३ मार्च २००३ रोजी वंशपरंपरागत कायम विश्वस्त प्रतिनिधी पदावरून काढले.

याबाबतचा बदल अर्ज अहिल्यानगर येथील सहाय्यक धर्मादाय कार्यालयात दाखल झाल्यावर त्याच्या चौकशी दरम्यान विश्वस्तांनी मिलिंद क्षीरसागर यांचा कार्यकाल संपला तसेच संस्थेच्या हिताविरुद्ध वर्तन करून कमीपणा आणला या कारणाने त्यांना विश्वस्त पदावरून काढून टाकले असा पवित्रा घेतला. या विरुद्ध मिलिंद क्षीरसागर यांनी गुरुदेवांनी नियुक्त केलेल्या वंशपरंपरागत कायम विश्वस्त प्रतिनिधी यांना काढण्याचा इतर विश्वस्तांना अधिकार नाही व ज्या विश्वस्त सभेमध्ये त्यांना काढले ती बेकायदेशीर आहे हे मुद्दे प्रामुख्याने उपस्थित केले होते. सदरहु बदल अर्जाची सुनावणी तब्बल सात वर्ष चालली होती. इतर विश्वस्तांना वंशपरंपरागत कायम विश्वस्त प्रतिनिधी यांना काढण्याचा अधिकार नसून ज्या विश्वस्त सभेमध्ये मिलिंद यांना काढले त्याच्या वैधतेबाबत सक्षम पुरावा व संयुक्त कारण देता आले नसल्याचे नमूद करून १८ फेब्रुवारी २०१० रोजी इतर विश्वस्तांनी दाखल केलेला तो बदल अर्ज अहिल्यानगरच्या सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी फेटाळला.

त्यानंतर इतर विश्वस्तांनी पुणे येथील विभागीय सह धर्मादाय आयुक्तांकडे अपील केले होते. अपीलाची सुनावणी करण्यास तब्बल चौदा वर्ष विश्वस्त मंडळाने विलंब लावला. अखेरीस सर्वोच्च न्यायालयाने कालमर्यादा घालून दिल्याने सह आयुक्त राहुल मामू यांनी दैनंदिन सुनावणी घेवून ४ मार्च २०२५ रोजी हा महत्वपूर्ण निकाल दिला. मिलिंद क्षीरसागर यांचे वकील एड. शिवराज कदम जहागिरदार यांनी ट्रस्ट स्थापनेपासून गुरुदेवांच्या धार्मिक व आध्यात्मिक परंपरा तसेच या कामातील निरीक्षक अहवालाचा फोलपणा, इतर विश्वस्तांचा वंशपरंपरागत कायम विश्वस्त प्रतिनिधी बाबत दुर्भावनापूर्वक दृष्टीकोण, इतर विश्वस्तांनी केलेला अधिकाराचा दुरुपयोग तसेच निरीक्षक अहवालाचा सोयीस्कर अर्थ काढून आणि ट्रस्ट कायद्यांच्या तरतुदींचा गैरवापर करून बदल अर्जातील बेकायदेशीरपणा निदर्शनास आणून देताना बदल अर्ज फेटाळण्याचा निर्णय कसा योग्य आहे हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यांचे सोबत एड. रोहिणी पवार यांनी गुरुदेवांचे एक अनुयायी मुरलीधर ऋषीपाठक यांचे वतीने बाजू मांडताना ट्रस्ट मधील गैरव्यवहार व मनमानी कार्यपद्धती बाबत युक्तिवाद करून मिलिंद क्षीरसागर यांना विश्वस्त पदावरून अनाधिकाराने काढले असल्याचे प्रतिपादन केले. इतर विश्वस्त तसेच हरकतदारांच्या सर्व मुद्यांचा साकल्याने विचार करून सह धर्मादाय आयुक्तांनी सुमारे सत्तर पानी निकालपत्र देऊन मिलिंद क्षीरसागर यांची बडतर्फी बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe