बनावट एटीएम कार्डच्या माध्यमातून लुटणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- पेट्रोल पंपावर एटीएम कार्ड वापरताना त्या कार्डाचे स्कॅनिंग करून डाटा चोरणे व त्याआधारे बनावट एटीएम कार्ड तयार करून नागरिकांच्या खात्यातून परस्पर पैसे लुटणाऱ्या टोळीच्या मुख्य सूत्रधाराला जेरबंद करण्यात अहमदनगर पोलिसांना यश आलं आहे.

अहमदनगरच्या सायबर पोलिसांनी या आरोपीला ठाणे येथून अटक केली आहे. सुजित राजेंद्र सिंंग असे या आरोपीचे नाव आहे अशी माहिती सायबर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली.

या आरोपींनी मे महिन्यात एटीएम कार्ड क्लोन करून वेगवेगळ्या एटीएममधून पैसे काढत एक लाख 44 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा अहमदनगरच्या भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना एटीएम सेंटर येथील सीसीटीव्ही फुटेजवरून दोन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं होत.

धीरज अनिल मिश्रा व सुरज अनिल मिश्रा यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून 31 बनावट एटीएम कार्ड व 2 लाख 61हजार 500 रुपये हस्तगत करण्यात आले होते. त्यांच्याकडे अधिकची चौकशी केल्यानंतर या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार सुजित राजेंद्र सिंग हा असल्याचे समोर आले.

तेव्हापासून सुजित हा फरारी होता. 11 सप्टेंबरला अहमदनगर सायबर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना सुजित सिंग हा वसई येथे येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे अहमदनगरच्या सायबरचे पोलीस उपनिरीक्षक प्रतीक कोळी, योगेश गोसावी,

उमेश खेडकर, दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, राहुल हुसळे, विशाल अमृते, अरुण सांगळे, गणेश पाटील, वासुदेव शेलार यांच्या पथकाने तेथे सापळा लावलाआणि मुख्य आरोपीला ताब्यात घेतले. पुढील तपास पोलिसांनी सुरू केला असून यात आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान आपले एटीएम कार्ड वापरताना नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रभारी पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी नागरिकांना केले आहे.